बऱ्याच शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांद्वारे पदवीदान समारंभासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आमंत्रित केलं जातं. अशाच एका कार्यक्रमाला हजेरी लावण्याची संधी अभिनेत्री परिणीती चोप्राला मिळाली. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या एका प्रशिक्षण केंद्राच्या पदवीदान समारंभासाठी परिणीतीने अभिनेता अक्षय कुमारसोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात परिणीतीने विविध विषयांवर तिचं मत मांडलं. पण, मत मांडताना तिने शेअर केलेल्या अनुभवामुळे ती चांगलीच गोत्यात आली आहे.

पदवीदान सोहळ्यादरम्यान परिणीतीने तिच्या शालेय जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिने आपल्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती असे सांगितले. बिकट परिस्थितीमुळे तिला सायकलने शाळेत जावं लागायचं, त्यासोबतच मार्शल आर्ट्स शिकण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याचंही ती म्हणाली. इतकंच नव्हे तर शालेय दिवसांमध्ये छेडछाडीसारख्या प्रसंगांचाही आपण सामना केल्याचं परिणीती यावेळी म्हणाली. तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला खरा. पण, परिणीती त्यामुळे चांगलीच गोत्यात आली आहे.

fb

फेसबुकच्या माध्यमातून परिणीतीच्याच मित्राने तिला सर्वांसमोर खोटं ठरवलं आहे. ‘परिणीती तुला एका चांगल्या कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही तू प्रसारमाध्यमांसमोर किती खोटं बोलत आहेस?  तुझ्याच शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला तुझ्या वडिलांकडे असलेली गाडीसुद्धा आठवतेय. राहिली गोष्ट सायकलवरुन शाळेत येण्याची, तर तेव्हा तो ट्रेंडच होता. त्यामुळे ज्यांना त्यावेळी सायकलवरुन शाळेत येण्याची संधी मिळाली नाही त्यांना याची खंत वाटायची’, असं कानू गुप्ताने त्याच्या एफबी पोस्टमध्ये लिहिलं आहे. परिणीती चोप्राचं हे वक्तव्य आणि त्यानंतर कानूची ही एफबी पोस्ट यामुळे आता कोण खरं आणि कोण खोटं बोलतय हा प्रश्न उद्भवत आहे. परिणीती, कानूच्या या पोस्टवर काय प्रतिक्रिया देणार हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे.

वाचा: बायोपिकसाठी सचिनने घेतलेले मानधन माहितीये का?