बायोपिक म्हणजेच चरित्रपटांचा ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत आहे. विविध खेळाडूंपासून ते उल्लेखनीय व्यक्तींपर्यंत अनेकांचेच बायोपिक साकारण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकरपासून ते अगदी सायना नेहवाल यांच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्याठी बऱ्याचजणांनी पुढाकार घेतला. जे चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली तर ज्या चरित्रपटांवर सध्या काम सुरु आहे त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता यामध्ये आणखी एका चरित्रपटाची भर पडणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताची ऑलिम्पिक स्टार पी.टी. उषा यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट साकारण्यात येणार आहे. या चित्रपटात पी.टी.उषाची भूमिका अभिनेत्री प्रियांका चोप्रा साकारणार असल्याची चर्चा आहे. १०० कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटाला संगीत देण्यासाठी ए.आर.रहमान यांच्या नावाला पसंती दिल्याचं कळतंय. तेव्हा आता प्रियांका आणि रहमान या चित्रपटात त्यांचं योगदान देण्यासाठी तयार होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या रेवती एस. वर्मा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतल्याचं कळत आहे. हिंदी, इंग्रजी, चिनी अशा ती भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

 

प्रियांकाविषयी सांगायचं झालं तर तिने याआधीही ‘मेरी कोम’ या चित्रपटामध्ये काम केलं आहे. बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमच्या आयुष्यावर साकारण्यात आलेल्या चित्रपटामध्ये प्रियांका मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यामुळे खेळाडूच्या भूमिकेसाठी नेमकी कशी तयारी करावी लागते याची तिला कल्पना असेलच. पण, तरीही पी.टी. उषा यांची भूमिका ऑनस्क्रीन साकारणं हे तिच्यासाठी काही प्रमाणात आव्हानात्मक ठरणार आहे ही बाब नाकारता येणार नाही.