अभिनेत्री राधिका आपटे आणि छायाचित्रकारांचं नातं तसं फार वाईट नाही. बऱ्याचदा कलाकारांची एक झलक टिपण्यासाठी धडपडणाऱ्या छायाचित्रकारांना कलाकारही निराश करत नाहीत. पण, नुकतंच मुंबईतील एका मॉलमध्ये ‘बाजार’ चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण करत असताना अभिनेत्री राधिका आपटे छायाचित्रकारांवर भडकली. मुख्य म्हणजे तिने लगेचच त्या छायाचित्रकाराला फोटो डिलिट करण्यास सांगितलं.

काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, काही दृश्यांच्या चित्रीकरणानंतर राधिका व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेली. त्यानंतर व्हॅनिटीतून बाहेर आल्यानंतर ती तिथे फेरफटका मारु लागली. त्याचवेळी एका छायाचित्रकाराने तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. ती व्यक्ती आपले फोटो काढत आहे हे लक्षात येताच राधिकाचा पारा चढला आणि तिने छायाचित्रकाराला चांगलंच खडसावलं. इतकंच नव्हे तर आपल्या परवागीशिवाय फोटो काढल्यामुळे त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत लगेचच ते फोटो डिलिट करण्यास सांगितलं. राधिकाला तिच्या या आगामी चित्रपटाचा लूक इतक्यात सर्वांसमोर उघड करायचा नव्हता. त्यामुळे त्यामुळेच तिचा राग अनावर झाल्याचं म्हटलं जातंय.

निखिल अडवाणी यांच्या दिग्दर्शनात ‘बाजार’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून, या वर्ष अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधिकासोबत सैफ अली खान आणि चित्रांगदा सिंग हे कलाकारसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

दरम्यान, बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळातच यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या काही अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेच्या नावाचाही समावेश होतो. विविध धाटणीच्या आणि चौकटीबाहेरच्या भूमिकांना न्याय देत राधिकाने बी टाऊनमध्ये तिची जागा बनवली आहे. ‘पार्च्ड’ या चित्रपटातील भूमिकेमुळे ती बरीच चर्चेतही आली होती. अभिनेता अजय देवगण आणि असेम बजाज यांची निर्मिती असलेल्या ‘पार्च्ड’ या चित्रपटाचे कथानक गुजरातमधील एका दुर्गम व दुष्काळग्रस्त खेड्यातील चार महिलांभोवती फिरलं होतं. एका नव्या विषयाला हाताळणाऱ्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारही मिळवले होते.