बॅडमिंटन क्षेत्रात भारताचा झेंडा रोवणारी सायना नेहवालचा प्रवास तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. सायनाचा हाच प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून या चित्रपटात सायनाची भूमिका आशिकी- २ फेम श्रद्धा कपूर ही साकारणार आहे. या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरही सज्ज असून पडद्यावर सायनाची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे तिने म्हटले आहे.

दिग्दर्शक अमोल गुप्ते हा सायना नेहवालच्या जीवनावरील चित्रपट करणार असून या चित्रपटाची आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मिल्खासिंग, महेंद्रसिंग धोनी, मेरी कॉम यांच्यापाठोपाठ आता सायनाच्या आयुष्यावरील चित्रपट येत आहे. या चित्रपटात सायनाची भूमिका कोण साकारणार याकडेही सर्वांचे लक्ष होते. अखेर पडद्यावरील सायना कोण साकारणार हे स्पष्ट झाले आहे. श्रद्धा कपूर ही या चित्रपटात सायनाची भूमिका साकारेल.

अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटासाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे म्हणत या चित्रपटासाठीची तयारी आणि एकंदर हा संपूर्ण प्रवास फारच कठिण असेल असे श्रद्धाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांची साथ आणि आशीर्वाद हवा असल्याचे श्रद्धाने नमूद केले.

सायनाच्या जीवनपटाशिवाय श्रद्धा ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ या चित्रपटातील श्रद्धाच्या लूकची सर्वत्र चर्चा आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या जीवनपटातून उसंत मिळत नाही तोच आणखी एका बायोपिकसाठी तिची निवड करण्यात आली आहे.

अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल श्रद्धा फारच उत्सुक आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाविषयी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने माहिती दिली आहे. ‘प्रत्येक मुलीने त्यांच्या आयुष्यात एकदातरी बॅडमिंटन खेळले असेल. सायनाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याने मला आनंद होत आहे. ती एक उत्तम दर्जाची बॅडमिंटनपटू तर आहेच, त्याशिवाय ती सध्याच्या तरुणाईसाठी एक आदर्शसुद्धा आहे.’, असं श्रद्धा म्हणाली.