कोणत्याही चित्रपटाचं खास स्क्रीनिंग म्हटलं की नेमके कोणकोणते कलाकार या स्क्रीनिंगला हजेरी लावणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. सध्या अशाच एका चित्रपटाचं स्क्रीनिंग चर्चेचा विषय ठरत आहे. ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची नकारात्मक भूमिका असणारा ‘बेवॉच’ हा चित्रपट पाहण्यासाठी शाहिद कपूरचा भाऊ इशान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी एकत्र गेले होते. त्यावेळीच काढलेले त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इशान खत्तर आणि जान्हवी कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याचही म्हटलं जात आहे.

बॉलिवूड पदार्पणापूर्वीच या नवोदित कलाकारांनी अशा पद्धतीनं चर्चेत येणं बऱ्याचजणांना रुचतही नाहीये. त्यामध्ये अभिनेता शाहिद कपूरच्या नावाचाही समावेश आहे. इशान सध्या ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याने फक्त आणि फक्त चित्रपटसृष्टीतील पदार्पणावरच लक्ष द्यावं, असे खडे बोलही शाहिदने त्याला सुनावल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, इशान आणि जान्हवी येत्या काळात स्क्रीन शेअर करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता या दोघांचं डेटिंग कनेक्शन कोणतं वळण घेणार हे येणारा काळच सांगेल.

वाचा: सावत्र बहिणींशी काहीही संबंध नाही- अर्जुन कपूर

इशान- जान्हवीला एकत्र पाहण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीसुद्धा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट पाहण्यासाठी हे दोघं एकत्र गेले होते. इशानसोबत नाव जोडलं जाण्यापूर्वी जान्हवी ही शिखर पहरीयासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जात होतं. विविध कार्यक्रमांनाही जान्हवीच्या कुटुंबियांसोबत शिखर हजेरी लावायचा. पण, एकाएकी या रिलेशनशिपमधून शिखरची एक्झिट होऊन इशानची एण्ट्री झाली.

दरम्यान, जान्हवी गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड पार्टी आणि पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावत आहे. त्यासोबतच सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. त्या तुलनेत अशा बॉलिवूड पार्टी आणि इतर कार्यक्रमांना इशानची हजेरी तशी कमीच पाहायला मिळते. येत्या काळात बरेच सेलिब्रिटी किड्स चित्रपटसृष्टीत नव्याने पदार्पण करणार असून यात इशान आणि जान्हवीचासुद्धा समावेश आहे.

ishaan

ishaan-jhanvi-759