बॉलिवूडची ‘बेबी डॉल’, अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी एक मुलगी दत्तक घेऊन तिचं पालकत्त्व स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील लातूरच्या एका मुलीला दत्तक घेत सनीने आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केलीये असं म्हणायला हरकत नाही. निशा कौर वेबर असं सनीच्या मुलीचं नाव असून, सध्या अनेकांनाच या मुलीची झलक पाहण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. निशाला दत्तक घेतल्यानंतरचे एक्सक्लुझिव्ह फोटो आमच्या हाती लागले आहेत.

बॉलिवूडमध्ये एकीकडे टेस्टट्युब बेबी आणि सरोगसीचं प्रस्थ वाढत असताना सनीचा हा निर्णय प्रशंसनीय ठरत आहे. याविषयी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सनी आणि डॅनिअलने त्यांचा आनंद व्यक्त केला. ‘मी निशाचा फोटो ज्यावेळी पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा आनंद आणि भावनांनी मी सद्गदीत झाले होते. (हसून) पालकत्वासाठी नऊ महिन्यांची वाट पाहावी लागते. पण, आमच्या बाबतीत तीन आठवड्यांमध्ये हे सर्व काही निश्चित करण्यात आलं’, असं सनी म्हणाली. यावेळी डॅनिअलनेही त्यांच्या कुटुंबातील नव्या आणि गोंडस पाहुणीच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. ‘आमचं आयुष्य फार वेगळं आहे. इथे नऊ महिन्यांचा काहीही संबंध नव्हता. माझ्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया भरपूर कागदपत्र आणि दोन वर्षांपासून सुरु असलेली प्रक्रिया होती. एके दिवशी अचानक मला मेल आला हे सगळं सुखद होतं. दोन वर्षांपूर्वी आम्ही एका अनाथ आश्रमाला भेट दिली होती’, त्यावेळीच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं डॅनिअलने स्पष्ट केलं.

 

‘आम्ही निशाची नाही तर, निशानेच आमची निवड केलीये. तर खुद्द डॅनिअलला अजूनही त्यांनी ही मुलगी दत्तक घेतल्याचा विश्वास बसत नाहीये. त्याने अनाथ आश्रमासाठी काम करण्याऱ्यांचे आभार मानले असून त्यांची प्रशंसा केली. तिला मी स्वत: जन्म दिला नाहीये. पण, तरीही कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी आम्ही मुलगी दत्तक घेण्याचा विचार का करु नये? असं म्हणत सनीने निशाला दत्तक घेण्याचं कारण स्पष्ट केलं. निशा कौर वेबर या नावाविषयीसुद्धा सध्या बरंच कुतूहल पाहायला मिळत आहे. त्याविषयी सांगताना सनी म्हणाली, ‘ते तिचं स्वत:चं नाव होतं. आमच्या विचारातही काही नावं होती पण, ती तिची स्वत:ची ओळख आहे.’ निशाच्या येण्याने सनीच्या कुटुंबाचा त्रिकोण आता पूर्ण झाला असून आपल्या व्यस्त वेळापत्रकातून ही बेबी डॉल तिच्या आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या बेबी डॉलची म्हणजेच निशाची काळजी कशी घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट