कितीही जनजागृती करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली आणि कितीही महत्त्वाचे संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या देशात कोणत्याही गोष्टीत लगेचच सुधारणा होत नाहीत. याचच उदाहरण नुकतच पाहायला मिळालं. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन समुद्रकिनारी शौचास बसलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. तिने पोस्ट केलेल्या या फोटोसोबत एक उपरोधिक कॅप्शनही दिलं होतं. पण, तिने ट्विट केलेल्या फोटोवरुन अनेक चर्चांना उधाण आलं. काहींनी तिच्या या ट्विटवर नाराजीचा सूरही आळवला.

ट्विंकलने ही सर्व परिस्थिती पाहात पुन्हा तोच फोटो नव्या कॅप्शनसह रिपोस्ट करत अनेकांचच लक्ष वेधलं. या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘मला टॉयलेट एक प्रेम कथा प्रदर्शित होण्याचं आणि त्या व्यक्तीचं उघड्यावर शौचास जाण्याचं टायमिंग आवडलं. तुम्हाला ही गोष्ट अपमानजनक वाटत असेल तर ठिक आणि तसे नसेल तरीही ती गोष्ट तुम्हाला अपमानजनक वाटणे गरजेचे आहे.’ हा फोटो आणि कॅप्शन पाहता ट्विंकलने माफी मागण्यास स्पष्ट नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे. ट्विंकलने पोस्ट केलेल्या या फोटोचं कॅप्शन पाहता आपल्याला इतरांची मतं जाणून घेण्यात काहीच रस नाही हेच तिने एका अर्थी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतंय.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

ट्विंकलने आणखी एका ट्विटमध्ये म्हटलंय, ‘ही व्यक्ती रोज मित्रांसोबत दारु पिण्यासाठी पैसे खर्च करत असेल. पण शौचालयासाठी मात्र तो पैसे खर्च करणार नाही.’ असं ट्विट करत ट्विंकलने त्यासोबत #GetUrHeadOutOfTheCrapper असा हॅशटॅगही दिला. मुख्य म्हणजे त्या ठिकाणापासून ७- ८ मिनिटांच्या अंतरावरच सार्वजनिक शौचालये आहेत याकडेही तिने लक्ष वेधलं. ट्विंकलने उघड्यावर शौचास बसलेल्या त्या व्यक्तीचा फोटो पहिल्यांदा पोस्ट केला होता तेव्हा अनेकांनीच तिच्या या ट्विटची खिल्ली उडवत नाराजीचा सूर आळवला होता.