अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या फाळणीची पार्श्वभूमी मांडणारे ‘बेगम जान’ चित्रपटातील ‘आझादियाँ’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. सनईच्या आर्त सुरांनी या गाण्याची सुरुवात होत असून, त्याला मिळालेली अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजाची जोड अंगावर शहारे आणणारी आहे. ‘आह निकली है यहा.. आह निकली है वहा, वाह री वाह ये आझादियाँ’ असे म्हणत पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा आवाज हृदयाचा ठोका चुकवतो. त्यांच्या आवाजाला साथ दिली आहे सोनू निगमने. दोन पट्टीचे गायक एकत्र आल्यामुळे हे गाणे सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

कौसर मुनीर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘आझादियाँ’ या गाण्याची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. या गाण्यातील शब्दांप्रमाणेच पडद्यावर दिसणारी दृश्येसुद्धा सर्वांचेच लक्ष वेधत आहेत. भारत-पाकिस्तान या देशांमध्ये फाळणीच्या वेळी काय परिस्थिती उदभवली असेल याची जाणीव गाणे पाहताना होते. ‘दो मुल्ख मिलकर आझादी आझादी खेल रहे है… इसलिए हमे अपना घर छोडना पड रहा है’ हा संवादही बरंच काही सांगून जातोय. त्यामुळे अनू मलिकने संगीतबद्ध केलेले हे गाणे प्रेक्षकांची दाद मिळवते आहे.

‘आझादियाँ’ हे ‘बेगम जान’मधील दुसरे गाणे असून, याआधी या चित्रपटातील ‘प्रेम मे तोहरे..’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. ‘बेगम जान’च्या निमित्ताने संगीत दिग्दर्शक अनू मलिक पुन्हा एकदा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळते आहे. १४ एप्रिलला विद्या बालनची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटामध्ये विद्या एका कुंटणखान्याच्या मालकिणीच्या म्हणजेच ‘बेगम जान’च्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक आणि भूमिकेवर असणारी तिची पकड पाहता विद्याच्या अभिनयाचे कौशल्य ‘बेगम जान’च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री विद्यासोबतच इला अरुण, गौहर खान, आशिष विद्यार्थी, रजित कपूर आणि नसिरुद्दीन शहा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.