बॉलीवूडमधली कलाकार मंडळी आणि त्यांचं व्यक्तिगत आयुष्य याभोवती कायमच एक वलय असतं. अगदी काही वर्षांपूर्वी अगदी गूढ समजलं जाणारं हे वलय आता मात्र प्रकाशांकित होतंय. खुद्द बॉलीवूडकरच हे वलय भेदू पाहतायत.
सेलिब्रिटींच्या आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना, माध्यमांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे. ते काय करतात? कधी उठतात? कधी झोपतात? त्यांचं कौटुंबिक, व्यक्तिगत आयुष्य याविषयी कायमच चाहत्यांना अप्रूप वाटत आलं आहे. अगदी गेल्या काही वर्षांपर्यंतचा शिरस्ता असा की सेलिब्रिटींनी त्यांचं व्यक्तिगत आयुष्य चाहत्यांपासून दूरच ठेवायचं. पण आताची बॉलीवूड ब्रिगेड मात्र हे संकेत मोडताना दिसतेय. हे बॉलीवूडकर स्वतहूनच त्यांचं व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्य चाहत्यांसमोर आणताना दिसतात.
शाहरूख खान जवळपास प्रत्येक ठिकाणी लहानग्या अबरामला घेऊन फिरत असतो. कधी त्याच्या सेटवर कधी एखाद्या कार्यक्रमात तर कधी आणखी कुठे.त्याच्या इन्स्टा आणि ट्विटर हँडलवरच्या अनेक पोस्ट अबरामविषयीच असतात. त्यामुळे अबराम हाच आता ट्विटरवर एक सेलिब्रिटी बनलेला आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासुद्धा आपल्या लेकाबद्दल आणि धाकटय़ा लेकीबद्दल ट्विट करताना दिसतात.
याबद्दल सिनेपत्रकार दिलीप ठाकूर म्हणतात, भारतीय कलासृष्टीत आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल गोपनीयता बाळगण्याची एक खोड होती. म्हणजे पार राजकुमापर्यंत वगैरे गेलो तर त्याचा मुलगा कोण, किंवा बायको कोण हे त्याने कधीच कुणाला कळू दिलं नाही. कपूर खानदानाने तर मुलं सिनेमात येईपर्यंत त्यांना प्रकाशझोतात आणलं नाही. ऋषी हा राजचा मुलगा आहे हे ‘बॉबी’च्या वेळेसच प्रेक्षकांना कळलं. तेच रणबीरचं झालं. नटांची मुलं कोणत्या शाळेत जातात?, काय करतात?, हे या नटांच्या चाहत्यांना अजिबात कळू नये, असंच त्यांना वाटायचं. तरीही काहीजण मात्र मुद्दाम आपल्या मुलांना पत्रकारांसमोर आणायचे. जेव्हा राजेश खन्नाने डिंपलसोबत लग्न केलं आणि त्यांना दोन मुली झाल्या तेव्हा त्या चौघांचा स्विमिंग पूलवर बसलेला एक फोटो एका प्रसिद्ध नियतकालिकाने छापला होता. ट्विंकल खन्ना १३-१४ वर्षांची असताना राजेश खन्नाने ‘अलग अलग’ या सिनेमाचा मुहूर्त ट्विंकलच्या हस्तेच केला. पुढे ४-५ वर्षांनी ट्विंकल स्वतच सिनेमात आली. १९९३साली एका सिनेमाच्या मुहूर्ताला जया बच्चन अभिषेक बच्चनला घेऊन आल्या होत्या. पण ही झाली काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी उदाहरणं.. त्यापलीकडे जर पाहिलं तर अनेक बडे कलाकार आपल्या कुटुंबाला प्रेक्षकांपासून आणि चाहत्यांपासून दूर ठेवण्यातच धन्यता मानत होते. पूर्वीचे कलाकार आपल्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरू नयेत, यासाठी अतिशय काळजी घेत असत. पण आताच्या कलाकारांनी हा चष्माच उलटा केला. पत्रकारांनी आपल्याला प्रश्न विचारण्याच्या आधीच ते आपली माहिती देऊ लागले आहेत. ‘पेज थ्री’ कल्चरचा हा बदललेला प्रकार म्हणता येईल. हा बदल म्हणजे एकाअर्थी जागतिकीकरणाचे परिणाम म्हणता येतील. हॉलीवूडमध्ये आपलं व्यक्तिगत आयुष्य आणि त्याचं गॉसिप्स यावर अनेक लोक सेलिब्रिटी झालेले आहेत. बॉलीवूडमध्ये आणि आता मराठीतही तशाच प्रकारचं ग्लॅमर येऊ पाहतंय. कलाकार म्हणजे कुणीतरी दुसऱ्याच विश्वातले. जे कायम तरुण असतील असा जो समज होता, तो आता बदलतोय. कलाकार म्हणजे त्यांच्या चाहत्यांसारखेच हाडामासाचे, मातीचे पाय असलेले आहेत. त्यांच्या घरातही सर्वसामान्य नवरा-बायकोप्रमाणे संवाद होतात. त्यांचीही मुलं त्यांना ‘बाबा यू आर सो ओल्ड स्कूल’, असलं काहीतरी बोलू शकतात. हेच या साऱ्यातून दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपूर्वीच टिंवकल खन्नाने एक पोस्ट टाकली होती. त्यात ती म्हणाली, ‘‘आई, तुला काही गाडी चालवता येत नाही. तू मला गाडीने सोडू नकोस. असं म्हणून माझ्या मुलाने मला गप्पच केलंय.’’ बाकीच्या वेळी लोकांना तडकाफडकी उत्तरं देणारी टिंवकल आपल्या मुलाच्या या वाक्यावर मात्र सर्वसामान्य आईप्रमाणे गप्प बसली.
फक्त मुलांचा मुद्दाच नव्हे तर इतरहीबाबतीत बॉलीवूडचे कलाकार खुल्लमखुल्ला चाहत्यांशी बोलतायत. परिणिती चोप्रा तिच्या सहज आणि शिवांग या दोन भावांसोबतचे फोटो शेअर करत असते. आलिया भट तिच्या आईसोबतचे फोटो ट्विट करते. अनेकदा मुलाखतींमधून ती वडिलांसोबतचं तिचं नातं मुद्दाम बोलून दाखवत असते. नुकतंच सलमान खानच्या बहिणीचं लग्न झालं. आता तिला मुलगाही झाला. सलमानने आपल्या भाच्यासोबतचा व्हिडीओ मुद्दाम शेअर केला. त्याच्या प्रसिद्धीप्रमुखांनी हा व्हिडीओ चाहत्यांपर्यंत पोहोचेल अशी सोय केली होती, तीही ‘सल्लू मामू किती गोड आहे नाई’ अशा लाडीक फोटोओळीसकट. नुकतंच करिना कपूर आणि सैफ अली खानने ते आईबाबा होणार आहेत, हे मोठय़ा उत्साहाने जाहीर केलं. शाहीद कपूर तर इन्स्टा आणि ट्विटरवर बायको मीरासोबतचे अनेक फोटो टाकत असतो. त्यांना बाळ होणार आहे, हे त्यांनी इथेच जाहीर केलं आहे. रितेश देशमुखने तर आपल्या लग्नापासून आपल्या दोन्ही लेकांच्या येण्याची खबर सोशल मीडियामधूनच चाहत्यांना दिली. सतत लोकांपुढे राहणं, त्यांना दिसत राहणं ही आजच्या झगमगत्या क्षेत्राची एक गरज झाली आहे. आपण सतत काही ना काही करून चर्चेत राहणं, ही आजच्या अनेक प्रथितयश कलाकारांचीही निकड बनली आहे. त्यामुळेच मग बिपाशा बसूसारखी आता हाती फारसे सिनेमे नसणारी अभिनेत्री आपल्या लग्नाच्या आणि हनिमूनच्या फोटो शेअरिंगवर भाव खाऊन जाते. सेलिना जेटली परदेशात स्थायिक होऊनही मुलं आणि नवऱ्याचे फोटो शेअर करत भारतीय चाहत्यांचं मन जिंकून घेते. यामागचं कारण सांगताना सोशल मीडियात काम करणारे विल्सन मॅस्कॅरिनस हे तज्ज्ञ म्हणतात, ‘‘कलाकारांना स्वतचा एक ब्रँड तयार करायचा असतो.’’ त्यांच्याबद्दलच्या बातम्या तर सारेच देतात, पण कलाकार जेव्हा स्वतच स्वतची माहिती देतो तेव्हा त्याचं मूल्य वेगळंच असतं. चाहत्यांशी स्वतला जोडून घेण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन असतं. कारण चाहते हे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे झाले आहेत. सलमान खानने ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाचा पहिला ट्रेलर लाँच केला तो त्याच्या चाहत्यांसोबत. त्याच्या व्यवस्थापकाने सलमानच्या काही प्रमुख चाहत्यांना खास निमंत्रण देऊन हा ट्रेलर पाहायला बोलावलं. त्यांना हा ट्रेलर दोन वेळा दाखवावा लागला. कारण पहिल्या वेळी ट्रेलर सुरू झाल्या झाल्या या चाहत्यांनी भाईजान भाईजान असा गजर सुरू केला. एखाद्या कलाकारासाठी ही नक्कीच मोठी आणि मानाची गोष्ट आहे. चाहत्यांची हीच ताकद आजच्या कलाकारांनी ओळखली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबत कायम जोडलेले राहण्यासाठी सोशल मीडियासारख्या माध्यमांचा आधार घेतला जातो.

लोकांपासून काही लपवण्याऐवजी आपणच त्या सांगून टाकण्यात हल्लीचे कलाकार धन्यता मानत आ?हेत. यासाठी उत्तम माध्यम म्हणजे सोशल मीडिया. – दिलीप ठाकूर, ज्येष्ठ सिनेपत्रकार

सेलिब्रिटींना काही करून चर्चेत राहायचं असतं. मग सतत त्यांनी फक्त सिनेमाच्या किंवा नव्या प्रोजेक्टच्या बातम्या ट्विट केल्या तर चाहतेही समजून जातात की हा माणूस इथे फक्त प्रसिद्धीसाठी आला आहे. शिवाय त्यांच्या सिनेमांविषयी वर्तमानपत्रं, विविध वाहिन्या काहीना काही सांगतच असतात. अशा वेळी या चाहत्यांसोबतचा संपर्क वाढवण्यासाठी सेलिब्रिटी मग व्यक्तिगत किंवा खासगी आयुष्यातल्या गोष्टी शेअर करू लागतात. – विल्सन मॅस्कॅरिनस, डिजिटल सव्‍‌र्हिसेस मॅनेजर

पूर्वीच्या काळात सेलिब्रिटींना आपल्या व्यक्तिगत गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवण्याची सवय होती. त्या काळानुरुप अशाप्रकारे अलिप्त राहणं योग्यही होतं. पण सोशल मीडियाने आपल्या जीवनात शिरकाव केल्यानंतर मात्र हे सगळं बदललं. आज अनेक सेलिब्रिटी केवळ आपल्या चाहत्यांसोबत जोडले जाण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतात. त्यासाठीच ते स्वतःच्या व्यक्तिगत गोष्टीही चाहत्यासोबत शेअर करत असतात. स्वतःबद्दल ते चाहत्यांना सांगतातच पण त्यांच्याबद्दलही काही जाणून घेण्यात विशेष रस घेतात. दीपिका पदुकोनचं उदा. घेतलं तर तिला सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोइंग आहे. ती प्रत्येक वेळी आपल्या चाहत्यांना आवर्जून उत्तर देत असते. नुकतंच तिने तिच्या एका चाहत्याच्या वडिलांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कारण त्या चाहत्याने तिला तशी विनंती केली होती. अशाप्रकारे कुणा चाहत्यासोबत जोडलं जाणं हे केवळ सोशल मीडियातूनच शक्य होऊ शकतं. – गौतम ठक्कर, सीईओ एव्हरीमीडीया टेक्नॉलॉजीज

स्वाती केतकर-पंडित