बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतातच. पण, आता प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी या कलाकार मंडळींना आणखी एक माध्यम मिळालं आहे, ते म्हणजे टेलिव्हिजन कार्यक्रम. विविध रिअॅलिटी शो आणि काही खास कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही बॉलिवूड सेलिब्रिटी लिलया पेलत आहेत. अशा कलाकारांमध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान यांच्या नावांचा समावेश आहे. यासोबतच बी- टाऊनच्या इतर काही कलाकारांच्या नावाचाही यात समावेश आहे. अशा या कलाकारांच्या खुसखुशीत सूत्रसंचालन शैलीप्रमाणेच त्यांच्या मानधनाचे आकडे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळतं. चला तर मग जाणून घेऊया या कलाकारांच्या मानधनाचे आकडे…
किंग खान म्हणून नावारुपास आलेल्या अभिनेता शाहरुख खानने त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच. पण, त्यासोबतच तो विविध कार्यक्रमांमध्येही उपस्थिती लावतो. त्यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे ‘टेड टॉक्स’. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी शाहरुखला ३० कोटी रुपयांचं मानधन मिळालं आहे.

किंग खान मागोमाग अभिनेता दबंग खानही या यादीत आहे. ‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या १० व्या पर्वात एका भागाच्या सूत्रसंचालनासाठी ८ कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेही ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोच्या प्रत्येक भागासाठी तिला १ कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं होतं.

‘कौन बनेगा करोडपती’ या सर्वांच्याच आवडत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांना एका भागासाठी २ कोटी रुपयांचं मानधन मिळायचं. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरु होणार असून, त्यासाठी बिग बींच्या मानधनातही वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बरीच लोकप्रियता मिळवलेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या एका भागासाठी आमिरला ३ ते ४ कोटी रुपयांचं मानधन मिळतं.


‘सुपर डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या शिल्पा शेट्टीला १०- १४ कोटी रुपये मिळाले होते.

(वरील माहिती विविध वेबसाइट्सवर उपलब्ध आकडेवारीवरुन मिळाली असून लोकसत्ता ऑनलाइनने याची खातरजमा केलेली नाही)