परदेशात सेलिब्रिटींवर सहसा छायाचित्रकारांची नजर नसते असं कितीही म्हटलं तरीही त्याला शह देणारी गोष्ट नुकतीच घडल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हे दोघंही धुम्रपान करताना दिसत आहेत. फोटोंमधील केमिस्ट्री बघून त्यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चाही रंगल्या आहेत. तर माहिराचे सिगारेट ओढणं आणि तिचे कपडे यावरुन तिच्यावर टीकाही होत आहे.

पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस झातल्यामुळे तिच्यावर अनेकांनी आगपाखड केली. त्यातही एक मुस्लिम महिला आणि एका मुलाची आई असलेली माहिरा धुम्रपान करताना दिसत असल्यामुळे काही नेटिझन्सचा राग अनावर झाला. तिच्या विरोधात अनेकांनी ट्विट करत टीका केल्या. या सर्व प्रकरणामध्ये तिला मनोरंजन वर्तुळातील काही सेलिब्रिटींनी साथ दिली. अभिनेता अली जफरने सोशल मीडियावर एक खुलं पत्रं पोस्ट करत आपलं मत मांडलं. ‘प्रत्येक महिलेला काही गोष्टींची निवड करण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार आहे’ हा मुद्दा त्याने या पत्रातून अधोरेखित केला. तर आपल्यातील संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे, अशी खंतही त्याने या पत्रातून व्यक्त केली.

https://www.instagram.com/p/BZVYwxIn5vB/

वाचा : माझा मुलागा कोणत्याही मुलीला भेटू शकतो- ऋषी कपूर

चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचलेल्या अभिनेत्री परिणीती चोप्रालाही यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर महिलेला तिच्या कपड्यांवरुन आणि ती धुम्रपान करत आहे या मुद्द्यावरुन पारख करु नका असे स्पष्ट करत ती म्हणाली, ‘हे खरंतर चुकीचं आहे. सर्वांना माहीत आहे की ही बाब चुकीची असून, हे सर्व थांबण्याची गरज आहे. हल्ली सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्टीचा गहजब केला जातोय.’ तिच्याशिवाय अभिनेता वरुण धवननेही याविषयी त्याचं मत मांडलं. ‘पीटीआय’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘तिची खिल्ली उडवणाऱ्यांचा धिक्कार असो’, असं तो म्हणाला.