टीव्ही अभिनेता आणि बिग बॉसमधील स्पर्धक Ajaz Khan एजाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एजाजने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच एक इशारा दिला आहे. जर मोदींनी अनिल अंबानींना फोन केला तर मी त्यांच्यापुढे नतमस्तक होईन असा इशारा एजाजने दिला आहे. एजाज सध्या ताहिर नावाच्या एका कर्करोगग्रस्त मुलाच्या उपचारासाठी निधी गोळा करत आहे. मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयाबाहेरच हा व्हिडिओ शूट केला असून त्या व्हिडिओतून एजाजने अनेकांनाच ताहिरची मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

पुरेशा पैशांअभावी त्या मुलाच्या उपचारांमध्ये अडचण येत असल्याचं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओतून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर होणाऱ्या अवाजवी खर्चाकडेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यासोबतच प्रशासनाकडेही ताहिरच्या मदतीची मागणी केली आहे. एजाजचा हा व्हि़डिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत असून, अनेकांनी तो शेअरही केला आहे.

वाचा : टेलिव्हिजनवर ब्रम्हचर्याची शपथ घेणारा हा अभिनेता आजही अविवाहित

या व्हिडिओमध्ये भारत- पाकिस्तान सामन्याला सर्वांनी दिलेलं महत्त्वं पाहता नको त्या गोष्टींना आपण जास्त महत्त्व देत आहोत हे म्हणत त्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच ताहिरच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. एजाज खानचा हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांसोबतच बऱ्याच जणांनी त्यावर टीकाही केली आहे. एजाज नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्यातही कोणतंही भान न राखता पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओतून तो अनेकांचा रोषही ओढवून घेतो.

पाहा : .. हे आहेत ऑनस्क्रिन आई-वडिलांनाच डेट करणारे सेलिब्रिटी