महाभारतावर टिप्पणी केल्याबद्दल अभिनेते कमल हसन यांच्याविरोधात तामिळनाडूमधील एका न्यायालयाने समन्स बजावला आहे. एका हिंदू संघटनेने कमल यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती, ज्यावर आता न्यायालयाने समन्स बजावला आहे.

मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, कमल यांनी एका मुलाखतीत, ‘महाभारतात पुरुष जुगार खेळत असताना द्रौपदीचा एक प्यादा म्हणून वापर केला गेला होता. तिला दुय्यम स्थान दिले गेले. भारतात महिलेला एक वस्तू समजून, जुगारासाठी एक प्यादा म्हणून वापरलेल्या त्या पुरूषांच्या आयुष्यावर बेतलेल्या महाभारताला इथे मान दिला जातो.’ असे विधान केले होते. हसन यांच्या या वक्तव्यानंतर संघटनेने तिरूनेलवेली येथील न्यायालयात याचिका दाखल करत चेन्नईतील पोलीस आयुक्तालयात याबाबत तक्रार नोंदवली होती.

”विश्वरूपम’ सिनेमात मुस्लिम धर्माची नकारात्मक बाजू दाखवण्यात आल्याने त्यावेळी अनेक मुस्लिम संघटनांनी या सिनेमाचा विरोध केलेला. इतर कोणत्याही धर्माबद्दल बोलण्याची त्यांची हिंमत नाही. ते हिंदूविरोधी आहेत म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली,’ असे विधान हिंदू मक्कल काची संघटनेचे सरचिटणीस रामा रवीकुमार यांच्या वतीने देण्यात आले होते. हिंदू मक्कल काची संघटनेच्या सदस्यांनी १५ मार्चला चेन्नईतील पोलीस आयुक्तालयात कमल हसन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.