कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या ‘दंगल’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात उल्लेखनीय कामगिरी करत आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जागतिक पातळीवर तब्बल २००० कोटींच्या कमाईचा आकडा पार करणारा ‘दंगल’ सर्वात पहिला चित्रपट ठरला आहे. फोर्ब्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार ५३ व्या दिवशी दंगलने अडीच कोटींची कमाई करत २००० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.

आमिरच्या कारकिर्दीतही या चित्रपटाच्या निमित्ताने काही नवे विक्रम ‘याची देही याची डोळा’ पाहण्याची, त्या विक्रमांचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ. परदेषी भाषांच्या यादीत आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटाचं नावही आदबीने घेतलं जात आहे. या भारतीय चित्रपटाने ‘कॅप्टन अमेरिका- सिव्हिल वॉर’, ‘ट्रीपल एक्स…’, ‘ट्रान्सफॉर्मर्स- डार्क ऑफ द मून’, ‘टायटॅनिक ३ डी’, ‘द जंगल बुक’, ‘कुंग फू पांडा ३’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्वातही ‘दंगल’च्याच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. चिनी दिग्दर्शक लू चुआन यांनीही या चित्रपटाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. ‘दंगलने चिनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही एक प्रकारची प्रेरणा दिली आहे. या चित्रपटाची चीनमध्ये फारशी प्रसिद्धी न करताच सर्व कलाकार इथे बरेच प्रसिद्ध झाले आहे. मुख्य म्हणजे चिनी प्रेक्षकांनाही या चित्रपटाचं कथानक फारच भावलं आहे’, असं मत त्यांनी मांडलं.

नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाने खऱ्या अर्थाने इतर चित्रपटांना धोबीपछाड केलं आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींची यशोगाथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेतून आमिर झळकला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच, परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या यादीत या चित्रपटाला अव्वल स्थान मिळालं होतं.