अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरतो आहे. अभिनेता सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान या चित्रपटाचून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे हे त्यामागचं मुख्य कारण आहेच. त्याशिवाय सारा आणि सुशांत सिंग राजपूत या नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार असल्यामुळेही बरीच उत्सुकता आहे. पण या सर्व वातावरणात आणखी एका गोष्टीने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. ती गोष्ट म्हणजे सारा सेटवर दाखवत असलेले नखरे.

जवळपास आठवडाभरापासून ‘केदारनाथ’च्या सेटवरुन साराच्या नखरेल वागण्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. लूकपासून ते मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीत तिची आडकाठी असल्याचंही म्हटलं जात होतं. चित्रपटाविषयी अशा प्रकारच्या चर्चा रंगत असल्याचं पाहून निर्माता अर्जुन एन. कपूरने पुढाकार घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘सारा ही एखाद्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून विचार करणारी अभिनेत्री आहे. अभिषेकने ज्या दृष्टिकोनातून तिची भूमिका आखली आहे अगदी त्याच नजरेतून साराही त्याकडे पाहते. म्हणून तिने इतक्या ऑफर्स येत असतानाही पदार्पणासाठी या सर्वोत्तम चित्रपटाचीच निवड केली.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

साराविषयी काही गोष्टी स्पष्ट करत अर्जुनने ती कोणत्याही प्रकारचे नखरे दाखवत नसल्याचं स्पष्ट केलं. ‘या सर्व गोष्टी खोट्या असून, एखाद्या होतकरु अभिनेत्रीविषयी अशा चर्चा रंगणं अयोग्य आहे. कारण, सारा समर्पणाने या चित्रपटात तिचं योगदान देते आहे’, असंही सांगितलं. सारा जेव्हा चित्रपटाच्या तालमीसाठी पहिल्यांदाच आली होती तेव्हा ती चांगलीच रुळली होती. मुख्य म्हणजे तिने चित्रपटाची संकल्पना नीट समजून घेतली असून, त्या अनुषंगानेच काम करण्यासही सुरुवात केली आहे. तेव्हा, निर्मात्यांनी इतकं तोंड भरुन कौतुक केल्यानंतर आतातरी याविषयीच्या चर्चा थांबतील अशीच अपेक्षा आहे.