बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’चा ट्रेलर प्रदर्शित होताच अनेकांनी त्याची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. चित्तोढच्या किल्ल्याच्या इतिहास, राजपूत संस्कृतीची पार्श्वभूमी, भव्य सेट आणि असंख्य कलाकार या साऱ्याची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळाली. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या लूकनेसुद्दा अनेकांची मनं जिंकली. राजेशाही थाट आणि पारंपरिक अंदाज या साऱ्याची सुरेख सांगड घालत ‘राणी पद्मावती’, ‘महारावल रतन सिंह’ आणि ‘अलाउद्दीन खिल्जी’ या व्यक्तिरेखा साकारण्यात कलाकारांना यश मिळाल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली.

‘पद्मावती’चा ट्रेलरच इतका तगडा आहे तर मग चित्रपट कसा असेल, असा कुतूहलपूर्ण प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. यासोबतच सोशल मीडियावर काही अतरंगी नेटिझन्सनी त्यांच्या कल्पकतेला चाळवत ‘पद्मावती’च्या ट्रेलरचे काही अफलातून ‘मीम्स’ पोस्ट करण्यास सुरुवात केली. ट्रेलरमधील एका दृश्यात रणवीर त्याच्या चेहऱ्यावर भगवा रंग लावताना दिसत आहे. त्याच दृश्याचा स्क्रिनशॉट पोस्ट करत एका युजरने ‘लहू मुह लग गया…’ या गाण्यात थोडा बदल करत म्हटलंय ‘भगवा मुह लग गया…’. तर अपेक्षा आणि वास्तव या दोन गोष्टींची मांडणी करत एका युजरने रणवीरचा आणखी एक मीम पोस्ट केला आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

शाहिद कपूरच्या लुकवरही मीम्सची बरसात केल्याचं पाहायला मिळतंय. ‘चेतन भगतचं पुस्तक जेव्हा तुम्हाला कोणी भेट देता, तेव्हा….’ असं उपरोधिक ट्विट करत शाहिद एका अग्निकुंडासमोर उभा असतानाचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. तर दीपिकाच्या दागिन्यांनी मढलेला लूक पाहून तिला बोलताना दागिन्यांमुळे अडथळा आलाच असेल. अशा आशयाचं ट्विटही करण्यात आलं. ‘पद्मावती’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर त्याचे ‘मीम्स’ही चर्चेत आले. गेल्या काही दिवसांपासून हा ट्रेंड सोशल मीडियावर बराच प्रचलित असून, अशाच एखाद्या ‘मीम’मध्ये त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या आपल्या मित्रमंडळींना टॅगही करण्यात येत आहे.