भारताचा स्वातंत्र्य लढा आणि एकंदर स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व परिस्थिती पाहता आजवर चित्रपटसृष्टीतही या गोष्टीची दखल घेण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आणखी एक चित्रपट साकारण्यात आला असून दिवंगत अभिनेते ओम पुरी यांचीसुद्धा त्यात मुख्य भूमिका आहे. गुरिंदर चढ्ढा दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘पार्टीशन १९४७’ असं असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये काही अडचणी आल्या आहेत. पाकिस्तानमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली असून, आता त्याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या चर्चांना सोशल मीडियावरही उधाण आलंय. #BannedInPakistan असा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं.

दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढाने ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालणं ही बाब दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं लक्षात येताच सोशल मीडियावर अनेकांनीच आगपाखड करण्यास सुरुवात केली. काहींनी तर पाकिस्तानविरोधी ट्विट करण्यासही सुरुवात केली.

गुरिंदर चढ्ढा दिग्दर्शित ‘व्हाइसरॉय्स हाऊस’चं हिंदी व्हर्जन असेलला ‘पार्टीशन १९४७’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला असून, फाळणीदरम्यानचा काळ या चित्रपटात साकारण्यात आला आहे. भारतातील शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि त्यांच्या पत्नी लेडी एडविना यांच्या मनात भारताप्रती असलेल्या भावना यांचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं असून, आलिया (हुमा कुरेशी) आणि जीत कुमार (मनीष दयाल) यांच्यामध्ये फुलणाऱ्या प्रेमाची कथाही दाखविण्यात आली आहे.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

प्रेक्षकांची पसंती मिळणाऱ्या या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये विनाकारण बंदी घालण्यात आल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे. भारत- पाकिस्तान नात्यांवर आणि एकंदर स्वातंत्र्यपूर्व काळावर, फाळणीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीसुद्धा बऱ्याच चित्रपटांवर पाकिस्तामध्ये बंदी घालण्यात आली होती.