फरहान अख्तर म्हटलं तर अनेकांच्या डोळ्यासमोर ‘रॉक ऑन’ हा चित्रपट येतो. या संगीतप्रधान चित्रपटाने अनेकांची मनं जिंकली होती. अचानक या चित्रपटाची आठवण होण्याचं कारण म्हणजे फरहानचा आगामी चित्रपट. त्याच्या ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि नकळत ‘रॉक ऑन’ची पुसटशी आठवण करुन गेला. पण, तसं पाहायला गेलं तर संगीत हा एक विषय सोडला तर या चित्रपटाचं कथानक फार वेगळं आहे. हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरतोय, कारण त्याचं पोस्टरही तितकच रंजक आहे. ‘प्लान कुछ और हे…’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं असून, तो ‘प्लान’ आहे तरी काय, हाच प्रश्न पडत आहे.

दरम्यान, फरहान साकारत असलेल्या किशन मोहन गिरहोत्राच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रसंगाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. स्वप्न की स्वातंत्र्य या दोघांपैकी किशन नेमकं काय निवडणार याचा उलगडा १५ सप्टेंबरलाच होणार आहे. कारागृह, गुन्हेगारी प्रवृत्ती, चुकीच्या मार्गाने निर्दोष व्यक्तीचं या चिखलात अडकणं आणि मग इच्छा नसतानाही तो मार्ग आपलासा करणं याचं वास्तवदर्शी चित्रण केल्याचं या ट्रेलरमधून पाहायला मिळतंय. या चित्रपटाची निर्मिती निखिल अडवाणीने केली असून दिग्दर्शन रंजीत तिवारीचे आहे.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

फरहानने नुकताच या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही सर्वांसमोर आणला होता. यामध्ये तो अतिशय सरळ- साध्या बिहारी मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. पण, गुन्हेगारांच्या हातात देतात अगदी तशीच पाटी त्याच्याही हातात दिसल्यामुळे हा साधाभोळा किशन गजाआड कसा, हाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनता घर करत होता. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे चित्र काहीसं स्पष्ट झालं. गायक बनण्याचं स्वप्न पाहणारा निर्दोष किशन म्हणजेच फरहान अख्तर या अभिनेता दीपक डोबरियाल आणि डायना पेन्टी यांच्या साथीने त्याचं ध्येय गाठणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.