गुलजार यांच्या दिग्दर्शनातच त्यांच्या गीताला राहुल देव बर्मनचे संगीत आणि किशोरकुमार व लता मंगेशकर यांचे एक्स्प्रेशन मेलडी म्हणजेच गायनातच भावमुद्रा असा योग जुळून आल्यावर ते अथवा त्या गाण्याना कधीच शिळेपण येत नाही. तर ती गाणी कायमच तारुण्यात राहतात.

तुम आ गये हो, नूर आ गया है…

पटकन ‘आंधी’च्या (१९७५) आठवणीत हरखून गेलात ना? गुलजार दिग्दर्शित राजकीय पार्श्वभूमीवरील ही परिपक्व प्रेमकथा. आणीबाणीत त्यावर बंदी घालण्यात आल्याने वादग्रस्त ठरली. चित्रपटगृहातून (मुंबईत मेट्रो) उतरवण्यात आला. पण रसिकांच्या ह्रदयातून गाणी कशी काढणार? ‘आंधी’मध्ये हे गाणे फ्लॅशबॅकमध्ये येते. छोटे मोठे फ्लॅशबॅक वापरत पटकथा खुलवणे गुलजार यांची दिग्दर्शन शैली. काश्मीरच्या सृष्टी सौंदर्यात जे. के. ( संजीवकुमार) व आरती देवी ( सुचित्रा सेन) हे पती पत्नी भेटतात, त्या पाश्र्वभूमीवर हे प्रेम गीत आहे.

जिने की तुमसे, वजह मिल गयी है
बडी बेवजह जींदगी जा रही है

आपल्या भेटीतून जगण्याचा अर्थ कळतोय… गुलजार ‘चित्रपट गीत’ लिहित नाहीत तर काव्य लिहितात याचाच हा छानसा प्रत्यय. आणि संजीवकुमार व सुचित्रा सेन आपल्या सहजाभिनयाने याच काव्याला सखोल अर्थ प्राप्त करुन देतात.

कहाँ से चले, कहाँ के लिए
ये खबर नही थी मगर

संजीवकुमार सहज गाता गाताच झाडावरचे फूल काढून सुचित्रा सेनच्या केसात माळतो. ती छानच हसते. पतीच्या प्रेमाला ती दाद देते. आरती देवी सत्तेच्या राजकारणात सक्रिय असल्यानेच या दोघांच्या भेटीचे योग तसे कमीच. आणि असे योग ते कसदार अर्थपूर्ण प्रेम गीतामधून जणू साजरे करीत.

दिन डूबा नही, रात डूबी नही
जाने कैसा है सफर

एकमेकांवरचे प्रेम व सहवासाचा आनंद ते असा व्यक्त करतात. सुचित्रा सेन हिंदी चित्रपटात फारच कमी प्रमाणात दिसली (बिमल रॉय दिग्दर्शित ‘देवदास’ इत्यादी). या गाण्यात ती छानच खुललीय. संजीवकुमार तसा कोणत्याही वयाच्या भूमिकेत कायम वावरणारा. गुलजार यांनी गाण्याच्या चित्रीकरणात रोमॅन्टिक मूड जपलाय. म्हणूनच तर ‘तुम आ गये हो…’ आठवताच पटकन आपल्याला त्यातील संजीवकुमारने सुचित्रा सेनच्या केसात भरलेले फूल देखिल आठवते.
दिलीप ठाकूर