काही काही गाण्यांची सुरुवातीची धुन नुसती कानावर पडली तरी त्या गाण्याचा मुखडा आपल्या ओठांवर येतो आणि मग ते गाणेच आपल्या डोळ्यासमोर दिसू लागते. हे गाणे देखील तसेच.

तेरे मेरे बीच मे
कैसा यह है बंधन अंजाना
मैने नही जाना
तुने नही जाना

एव्हाना प्रसाद प्रॉडक्शन्सच्या ‘एक दुजे के लिए'(१९८१) ची आंतरजातीय प्रेमकथेतील नाजूक वळण तुमच्या डोळ्यासमोर आले असेलच. गोव्याच्या निसर्ग सौंदर्यात ही वासू (कमल हसन) व सपना (रति अग्निहोत्री) यांची प्रेमकथा गुंतत, गुरफटत जाते आणि प्रेमाच्या पहिल्याच पायरीवर सपना वासूला प्रेमाने साद घालतं गात गाऊ लागते. ती पंजाबी तर तो दक्षिण भारतीय. त्याला हिंदी भाषेचा फारसा गंध नाही. पण ती मात्र अगदी असोशीसे आपले प्रेम व्यक्त करतेय,

पहनुगी मै तेरे
हाथो से कंगना
मेरी डोली जायेगी
तेरे ही अंगना

गोव्याचा फेसाळणारा समुद्र किनारा, बोचरा वारा, वेडेवाकडे खडक, वाळूची साथ, नारळाची भरपूर झाडं अशा निसर्गाच्या प्रसन्न सानिध्यात हे प्रेम गीत आणखीन खुललयं . पण वासूला हिंदी येत नसल्याने तो दक्षिणेकडील भाषेत विचारतो, रुंबा…

यावर सपना विचारते,
यह रुंबा रुंबा क्या है?

वासू हातानेच मोठी वस्तू असे सुचवतो. निर्माते एल. व्ही. प्रसाद व दिग्दर्शक के. बालचंदर यानी ही उत्कट प्रेमकथा गीत संगीतामधून अधिकच रंगवली. आणि त्यात कलाकारांची प्रभावी साथ लाभली हे या गाण्यातूनही दिसते. कमल हसन आपल्या मोकळ्या ढाकळ्या शैलीत उड्या मारत प्रेमाचा स्वीकार करतोय. तर रति अग्निहोत्री अत्यंत निग्रहाने आपली प्रेम भावना व्यक्त करतेय.

कितनी जुबाने बोले
लोग हम बोले
दुनिया मे प्यार की
एकही बोले

गाणे गोव्याच्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच खुलते. खरं तर या वातावरणाचा प्रभावी वापर केलाय असेच म्हणायला हवे. आनंद बक्षी यांचे गीत व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत यानी भरपूर आशयपूर्ण लोकप्रिय चित्रपट गीते रसिकांना दिलीत. पण हे अधिकच मंत्रमुग्ध करते. लता मंगेशकर यांच्या गायनातील भावार्थबद्दल वेगळे काही सांगायची गरज नाहीच. त्यांच्या गायकीला रतिनेही तितक्याच समर्थपणे साकारलयं हे गाण्यात प्रकर्षाने दिसते.

तेरे मेरे बीच मे
कैसा यह बंधन अंजाना

तुझ्या माझ्यातील हे प्रेमाचे नाते काही वेगळेच आहे हे सपना मनापासून व्यक्त करतेय. पण त्यांच्या प्रेमाला कुटुंबाकडून विरोध असल्याने तर या प्रेमिकांचे भवितव्य काय असा आपल्याला प्रश्न पडला असतानाच सपना मात्र वासूकडे आपल्या दोघांतील प्रेम नात्यातील विश्वास व्यक्त करतेय.

तुने नही जाना… मैने नही जाना
तेरे मेरे बीच मे
कैसा है यह बंधन अंजाना…
दिलीप ठाकूर