अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत-कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शाहिदच्या पत्नीने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर मुलाखत दिली होती. यावेळी कामावर न जाता घरी राहूनच आपल्या मुलांचे संगोपन करणाऱ्या महिला वर्गाचे तिने समर्थन केले होते. पण, तिच्या या वक्तव्यामुळे नोकरदार वर्गातील महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि सोशल मीडियावर मीराचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. मीराने केलेले वक्तव्य कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी केले नाही असे म्हणत शाहिदने त्यानंतर तिची पाठराखण केली. त्यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या इंडिया टुडे वुमन समिट २०१७ या कार्यक्रमात शाहिदने मीराच्या बाळंतपणीच्या दिवसांतील आठवणी सांगितल्या.

‘ती गरोदर होती असं म्हणण्यापेक्षा आम्ही गरोदर होतो, असं म्हणणं योग्य ठरेल. इथे आम्ही हा शब्द एक प्रकारच्या जबाबदारीची जाणीव करुन देतो’, असे शाहिद म्हणाला. ‘जेव्हा मीराची प्रसूती होणार होती, त्यावेळी मीसुद्धा अस्वस्थ होतो, माझा श्वास थांबला होता… तेव्हा, मी वेदना सहन करतेय तर, तू का अस्वस्थ होत आहेस? असा उलट प्रश्न मीराने विचारल्याचा उलगडा शाहिदने केला.

या कार्यक्रमामध्ये शाहिदने त्याच्या आणि मीराच्या नात्याविषयीही भाष्य केले. मिशा आम्हा दोघांचंही पहिलं प्रोजेक्ट आहे, असं मिश्किलपणे म्हणत शाहिदने सर्वांचेच लक्ष वेधले. मिशामुळे आपलेपणाच्या आणि मैत्रीच्या नात्याने आम्ही जोडलो गेलो आहोत, असेही शाहिदने स्पष्ट केले. मीराला दिलेल्या वचनाखातर शाहिदने धुम्रपान करणे पूर्णपणे बंद केले आहे हेसुद्धा त्याने या क्रार्यक्रमादरम्यान सांगितले.

अभिनेता शाहिद कपूर येत्या काही दिवसांमध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटामध्ये तो मेवाडचे राजा रावल रतन सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या तो या चित्रपटातील भूमिकेसाठी फार मेहनत घेत असून त्यासोबतच कुटुंबालाही पुरेसा वेळ देत आहे. त्यामुळे शाहिद आता खऱ्या अर्थाने ‘फॅमिली मॅन’ झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.