बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला होता. त्यामागोमागच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्या उत्साहात ‘पद्मावती’चा ट्रेलर प्रदर्शित झाला तोच उत्साह दोन दिवसांनंतरही कायम आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला. आता तर या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच एका विक्रमाची नोंद केली आहे.

‘वायकॉम १८’ या युट्यूब चॅनलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या ‘पद्मावती’च्य ट्रेलरला २४ तासात विक्रमी व्ह्यूज मिळाले असून, इतक्या कमी वेळात सर्वाधिक व्ह्यूज मिळवणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरच्या यादीत ‘पद्मावती’ने बाजी मारली आहे. पहिल्या २४ तासांत या चित्रपटाने १.५ कोटी व्ह्यूज मिळवले असून, युट्यूबवर आतापर्यंत ‘पद्मावती’चा ट्रेलर २ कोटी युजर्सनी पाहिला आहे. सध्याचा माहोल पाहता हा आकडा वाढच आहे.

चित्रपटाच्या लोकप्रियतेच्या दृष्टीने ही मह्त्वाची गोष्ट असल्यामुळे खुद्द रणवीर सिंगने यासंबंधीची एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. त्याने अतिशय मोजक्या शब्दांत एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलं, ‘हा चित्रपट माझ्यासाठी आकड्यांच्या पलीडे आहे. फार महत्त्वाचा आहे. पण, हा विक्रम खरच दखल घेण्याजोगा आहे.’ ‘बाहुबली २’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. तेव्हा एका अर्थी ‘पद्मावती’ने ‘बाहुबली’चं आव्हान पेललं, असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापासून या चित्रपटाच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच प्रेम, राजेशाही थाट, मातृभूमिचा आदर, राजपूत संस्कृती आणि अलाउद्दीन खिल्जीची असुरी वृत्ती या साऱ्याच्या चर्चा रंगल्या. ट्रेलरमधून प्रत्येक गोष्ट टीपण्यात भन्साळी यशस्वी झाले असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. तेव्हा आता तिकिटबारीवर हा चित्रपट विक्रमी कमाई करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.