‘अँग्री यंग मॅन’ ते आत्ता ‘चिनी कम’च्या बुद्धदेबपासून आगामी ‘तीन’च्या जॉन बिस्वासपर्यंत विविधांगी भूमिकांमधून अभिनयाचा शहेनशहा अमिताभ बच्चन अजूनही प्रेक्षकांवर गारुड करून आहे. तरुण दिग्दर्शकांमुळे आपल्यासाठी नवनवीन भूमिका साकारायला मिळतात याचं एकाच वेळी कौतुक आणि नवल नजरेत साठवत अमिताभ रिभु दासगुप्ताच्या या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने विद्या बालनबरोबर त्यांनी पुन्हा काम केले आहे. त्यांच्या आवडत्या कोलकाता शहरात चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. आणि भरीस भर म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबरही अभिनयाची भट्टी जमून आली आहे. ‘तीन’च्या कथेपासून चित्रीकरणापर्यंत ते नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत अमिताभ यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या..
‘तीन’ हा चित्रपट नावापासूनच वेगळा आहे. रहस्यमय कथा असलेल्या चित्रपटांसाठी लोकांची उत्कंठा वाढवण्यासाठी अशा काही अजब गोष्टी असणं आवश्यकच असल्याचं अमिताभ सांगतात. ‘तीन’ हा चित्रपटातील कथेत गुंतलेल्या तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असू शकतात किंवा या आकडय़ामागे आणखीनच काही रहस्य जोडलेलं असू शकतं. पण ते आत्ताच सांगून चित्रपटातील गंमत घालवण्यात आपल्याला रस नसल्याचं सांगत त्यांनीही चित्रपटाच्या नावाचं रहस्य दडवून ठेवलं आहे. ‘तीन’ हा चित्रपट ‘कहानी’ फेम दिग्दर्शक सुजॉय घोषची निर्मिती असली तरी दिग्दर्शन मात्र रिभू दासगुप्तांचे आहे. रिभूबरोबर याआधी आपण ‘युद्ध’ या मालिकेच्या निमित्ताने काम के लं होतं, असं ते म्हणतात. रिभूच्या कामाची पद्धत माझ्या ओळखीची आहे. ‘युद्ध’ मालिकेदरम्यानच कधीतरी चित्रपट करण्याविषयी चर्चा झाली होती. मात्र, ‘तीन’ची कल्पना सुजॉयकडूनच आली होती. त्याच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतरच या चित्रपटासाठी होकार दिला होता. त्यानंतर सुजॉयने दिग्दर्शनाची जबाबदारी रिभूकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा विद्या बालनबरोबर काम केले आहे. ‘पा’मध्ये त्यांनी विद्याच्या मुलाची भूमिका केली होती. विद्या खूपच चांगली अभिनेत्री असल्याची कौतुकाची पावती त्यांनी दिली. तिच्या पहिल्या चित्रपटापासून आत्ताच्या चित्रपटापर्यंत दरवेळी तिचे काम उत्तमोत्तम होत गेले आहे, असे अमिताभ यांनी सांगितले. विद्याबरोबरच नवाजुद्दीनसारख्या गुणवान कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
amit01 या वर्षांची सुरुवात ‘वजीर’सारख्या दणकेबाज चित्रपटाने झाल्यानंतर लागोपाठ ‘तीन’ आणि मग ‘पिंक’ अशा तीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ते दिसणार आहेत. याशिवाय, रामगोपाल वर्माच्या ‘सरकार राज ३’लाही त्यांनी संमती दिली असून त्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे. आपली कारकीर्द याही वयात इतकी व्यग्र असण्याचं श्रेय त्यांनी शुजित सिरकार, आर. बाल्की, सुजॉय घोष यासारख्या तरुण दिग्दर्शकांना दिलं आहे. हे दिग्दर्शक दरवेळी माझ्यासाठी नवनवीन व्यक्तिरेखा लिहितात. मला आव्हानात्मक ठरेल, अशा भूमिका ते माझ्यासाठी आणतात. त्यांच्या लिखाणातून, दिग्दर्शनातून ते चित्रपट प्रभावीपणे साकारतात. तुमच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा तुम्हाला अधिकाधिक आव्हानात्मक गोष्टी घेऊन स्वत:ला सिद्ध करत राहावं लागतं. आपल्या आयुष्यात ती वेळ आता या दिग्दर्शकांमुळे आली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र आपल्यापेक्षा आजच्या कलाकारांची तरुण पिढी अधिक आत्मविश्वासाने भरलेली आणि करिअर केंद्रित असल्याचं ते सांगतात.
amit02
‘तीन’मध्ये अमिताभ यांनी जॉन बिस्वास या अँग्लो-बंगाली माणसाची भूमिका केली आहे. सत्तरच्या दशकात नेणारी ही कहाणी खूप वेगवेगळी वळणं घेत पुढे सरकत राहते. मध्यमवर्गीय जॉनच्या घरात अशी एक अपहरणाची दुर्दैवी घटना घडते ज्याने त्याचं घर उद्ध्वस्त होतं. तरीही त्या घटनेचा माग घेण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती घटना का घडली होती, याचं कारण शोधण्याचा त्याचा तथाकथित वेडगळ प्रयत्न त्याला घरच्यांपासून दूर करतो. मात्र काही वर्षांनी तशीच घटना पुन्हा एकदा दुसऱ्याच्या आयुष्यात घडते आणि मग जॉन पुन्हा या शोधात स्वत:ला झोकून देतो. इथे जॉनच्या मनात सूड नाही आहे. त्यामुळे त्या अर्थाने ती सूडकथा होत नाही, असे अमिताभ स्पष्ट करतात. जॉनच्या व्यक्तिरेखेतून मानवी स्वभावाचा एक वेगळा पैलू पाहायला मिळेल, असं सांगणाऱ्या अमिताभ यांनी शुक्रवारी चित्रपटांचा जो निकाल लागतो त्यावर आपलं नियंत्रण नसल्याचं सांगितलं. कुठला चित्रपट चालेल आणि कुठला पडेल हे गणित आपल्याला कळत नाही. त्यापेक्षा अशाच चांगल्या आणि वेगळ्या भूमिका करत राहणं आपल्याला जास्त पसंत असल्याचं त्यांनी सांगितलं.

इतकी र्वष इंडस्ट्रीत राहिल्यानंतरही आपल्याला अजून कोणत्या भूमिका करायच्या आहेत, नेमक्या कोणत्या पद्धतीने पुढे जायचं हे लक्षात येत नाही. मात्र तरुण कलाकार किती नियोजन करून पुढे जातात याचं मला अप्रूप वाटतं. चित्रपट चालेल की नाही याबद्दलही त्यांना अंदाज असतो. धोका पत्करूनही ते ज्या आत्मविश्वासाने आपल्या करिअरची वाटचाल करतात ते पाहून त्यांच्याकडून शिकावंसं वाटतं.
अमिताभ बच्चन