सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने महिलांवर आधारीत ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमात आपत्तीजनक दृश्य आणि अपमानजनक शब्दांच्या भडीमार असल्यामुळे या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास मनाई दिली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड विरुद्ध बॉलिवूड कलाकार असे काहीसे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या सिनेमाला समर्थन देत अनेक कलाकारांनी सेन्सॉर बोर्डाची टीका केली आहे. निर्माते शाम बेनेगल, सुधीर मिश्रा, नीरज घैवान यांसारख्या इतर दिग्दर्शक, निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णाला विरोध दर्शवत प्रकाश झा यांच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमाला समर्थन दिले आहे.

फरहान अख्तरने सेंट्रल बोर्डाने प्रमाणपत्र का दिले नाही याच्याशी निगडीत एका पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यात फरहान म्हणतो की, ”लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याची कारणं यात दिली गेली आहेत. तुम्ही तुमची उल्टी करण्याची पिशवी तयार ठेवा.’

शाम बेनेगल यांनी सीबीएफसीवर निशाणा साधत म्हटले की, ‘सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणित करावे ना की सेन्सॉर करावे. मी सिनेमावर घातलेल्या बंदीच्या विरोधात आहे. कोणत्याही सिनेमा प्रदर्शित होऊ न देणे याचे समर्थन केलेच जाऊ शकत नाही.’ अभिनेत्री दिया मिर्झानेही या संदर्भात ट्विट करत म्हटले की, ‘प्रसारमाध्यमांनी प्रमाणन बोर्डाला सेन्सॉर बोर्ड बोलणे बंद केले पाहिजे. त्यामुळेच स्वतः सीबीएफसीही यावरुन संभ्रमीत आहेत.’

रेणुका शहाणे म्हणाली की, ‘अलंकता श्रीवास्तव हिच्या पुरस्कार विजेत्या ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमाला समजू न येणारी कारणं देऊन प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.’

‘मसान’ सिनेमाचे दिग्दर्शक घैवान यांनी अलंकताचे समर्थन करत ट्विटमध्ये म्हटले की, ‘लैंगिक समानतेसाठी पुरस्कार जिंकलेल्या अलंकता हिचा लिपस्टिक अंडर माय बुर्खा या सिनेमाला स्त्रीप्रधान असल्याचे सांगून पुरुषप्रधान विचार सरणीने दाबण्याचा प्रयत्न केला आहे.’ फिल्ममेकर अशोक पंडितनेही ट्विट करत म्हटले की, ‘मी प्रकाश झा यांचा ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याच्या निर्णयाची निंदा करतो. हा निर्णय पहलाज निहलानी यांचा अहंकार दाखवतो.’

पटकथा लेखक तसेच गीतकार वरुण ग्रोवरने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘हा सिनेमा न्यायालयात जाईल आणि तिथे ते सिनेमा प्रदर्शित करण्याची मंजूरी घेतील. भारत सरकार सीबीएफसीमध्ये काही बदल करण्याचे आश्वासन देईल, यामुळे काही लोक खूश होतील आणि पुन्हा एकदा काहीच नाही होणार. असेच कित्येक वर्ष चालत राहणार आहे.’

‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमात रत्ना पाठक, कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकुर, वैभव तत्ववादी, सुशांत सिंग, विक्रांत मेसी आणि शशांक अरोडा यांच्या मुख्य भूमिका आहेत.