तुम्हाला इंग्रजीत बोलावं लागेल…. हे शब्द जरी कानावर पडले तरी अनेकांना घाम फुटतो. तुमची मातृभाषा कोणतीही असो पण करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर इंग्रजी येणं आवश्यक आहे, असं बरेचदा म्हटलं जातं. आपल्या मुलांनी अस्खलित इंग्रजी बोलावं असं प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. आपल्याला इंग्रजी येत नसेल तर आपण समाजात मागे पडू किंवा परदेशात गेल्यावर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असेही विचार अनेकांच्या मनात असतात.

केवळ इंग्रजी येत नाही म्हणून सेलिब्रिटींप्रमाणे तुम्ही आयुष्यात यश संपादन करू शकणार नाही का? काही वर्षांपूर्वीच श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट आला होता. यात ती एक उत्तम गृहिणी दाखविली असून ती उत्कृष्ट जेवणंही बनवू शकते. मात्र, केवळ तिला इंग्रजी भाषा येत नाही म्हणून तिचा पती आणि मुलगी नेहमी तिची थट्टा उडवत असतात. पण, खऱ्या आयुष्यातही असे होते का? तर नाही. तुमच्यात जिद्द असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हीही काहीही करू शकतात. याचेच उदाहरण म्हणजे भारतातील काही प्रसिद्ध चेहरे ज्यांनी आपल्या कामाने केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर आपल्या देशाचीही मान उंचावली आहे. अशाच सेलिब्रिटींबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांना इंग्रजी तर येत नाही पण केवळ त्यांच्यातील कलागुणांमुळे ते आज यशाच्या शिखरावर पोहचले आहेत.

कपिल शर्मा
स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्धीस आलेला विनोदवीर कपिल शर्मा याला सर्वचजण ओळखतात. कपिलला करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी इंग्रजी किंवा इतर कोणत्याच भाषेची गरज नाही पडली. अमृतसरमधील सामान्य कुटुंबातून आलेल्या कपिलने त्याच्यातील कलागुणांच्या जोरावर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

दिलजित दोसांज
पंजाबी चित्रपटांमधील अभिनेता आणि गायक दिलजित दोसांजने ‘उडता पंजाब’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिलजितची मातृभाषा पंजाबी असून गर्वाने तो त्याचा स्वीकार करतो. त्याला केवळ पंजाबी भाषाच अस्खलितपणे बोलता येते. जेव्हा कोणी माझ्यासोबत इंग्रजीत बोलतं तेव्हा मी खूप अस्वस्थ होतो, असे दिलजितने एका मुलाखतीत सांगितले होते. पण, यामुळे कधीच त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा आला नाही.

कपिल देव
भारताला १९८३ साली वर्ल्ड कप जिंकवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनाही सुरुवातीला इंग्रजी बोलता येत नव्हतं. आता अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या कपिल देव यांना इंग्रजी येत नव्हतं हे फार कमी लोकांनाच माहित असेल. भारतीय संघाचा कर्णधार आणि तुला इंग्रजी बोलता येत नाही, असे एकदा एका व्यक्तीने त्यांना म्हटले होते. ही गोष्ट त्यांनी सकारात्मकरित्या घेत इंग्रजीचे धडे गिरवले. इतकेच नव्हे तर ते ‘रेपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स’ चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर देखील राहिले आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकी
‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने अभिनेता नवाजुद्दीनला प्रसिद्धी मिळाली. अभिनयात आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या नवाजुद्दीनला इंग्रजी मात्र येत नाही. याविषयी एका मुलाखतीत तो म्हणालेला की, मला इंग्रजी बोलता येत नसलं तरी ते कळतं. कलाकार म्हणून मी माझी प्रत्येक भूमिका चोखंदळपणे पार पाडतो. मग ती कोणत्याही भाषेत असो. जर मला इंग्रजीमध्ये २-३ पानांचे संवाद दिले तर मी ते पाठ करतो आणि मग बोलतो.

कंगना रणौत
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक यश मिळवणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कंगनाचे नाव येते. तिचे स्टाइल स्टेटमेण्ट असो वा एखादे वक्तव्य तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनते. आता बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळख असलेल्या या अभिनेत्रीचा सुरुवातीचा प्रवास फार खडतर होता. अनेकांनी तिची थट्टा उडवली पण त्यामुळे ती मागे हटली नाही. याबद्दल कंगना म्हणालेली की, सुरुवातीला मला कोणत्याच प्रश्नाचे उत्तर इंग्रजीमध्ये व्यवस्थित देता येत नव्हते. पण आता तिने इंग्रजीमध्ये बरीच सुधारणा केली असून केवळ तिच्या अथक मेहनतीने ती आज यशाच्या शिखरावर आहे.