महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांचं लैंगिक शोषण या साऱ्याविरोधात आवाज उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #MeToo असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर अनेकजणी त्यांना आलेल्या कटू अनुभवांबद्दल व्यक्त होत आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींचा समावेश आहे. टेलिव्हिजन कॉमेडियन भारती सिंग आणि युट्यूबर मल्लिका दुआनेसुद्धा आपलं लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला.

सध्या हा विषय बराच चर्चेत असून, मल्लिकाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन #MeToo हा हॅशटॅग वापरत तिच्यासोबतच घडलेला तो दुर्दैवी प्रसंग सर्वांसमोर आणला. तिने ही पोस्ट करताच कमेंट बॉक्समध्येही अनेकांनी आपापले विचार मांडण्यास सुरुवात केली. वयाच्या सातव्या वर्षी मल्लिकाचं लैंगिक शोषण झालं होतं. याविषयीच्या पोस्टमध्ये मल्लिकाने लिहिलंय, ‘#MeToo माझ्या स्वत:च्याच कारमध्ये मी या प्रसंगाला तोंड दिलं होतं. तेव्हा आई कार चालवत होती आणि ‘तो’ माझ्यासोबत मागच्या सीटवर बसला होता. पूर्णवेळ त्याचा हात माझ्या कपड्यांमध्ये (स्कर्टच्या आत) होता. त्यावेळी मी फक्त ७ वर्षांची होते आणि माझी बहीण ११ वर्षांची. त्याचा हात माझ्या स्कर्टमध्ये होता आणि माझ्या बहिणीच्या पाठीवर. त्यावेळी माझे बाबा दुसऱ्या कारमध्ये होते. त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली आणि त्याला रंगेहाथ पकडलं, तेव्हा त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.

मल्लिकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिच्या धैर्याची दाद दिली आहे. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविषयीसुद्धा चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं मत अनेकांनीच मांडलं आहे. या साऱ्याची सुरुवात हॉलिवूडमधून झाली. गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड चित्रपट निर्माते हार्वी वीनस्टीन यांचं प्रकरण चांगलंच गाजत असून हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर महिलांकडून #MeToo हा हॅशटॅग वापरून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली जात आहे.