काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाने आता १०० कोंटींची कमाई करत आणखी एक टप्पा पार केला आहे. २०१७ या वर्षाच्या सुरुवातीला ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केलेल्या या सिनेमाने आता अजून एक रेकॉर्ड बनवला आहे. २०१७ मध्ये जगभरात सर्वाधिक कमाई करणारा ‘जॉली एलएलबी २’ हा दुसरा सिनेमा ठरला आहे.

आतापर्यंत या सिनेमाने जगभराची कमाई मिळून १८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. असे असले तरी ‘रईस’च्या एकूण कमाईपेक्षा ही कमाई फार लांब आहे. ‘रईस’ने जगगभरात २८१.३३ कोटींची कमाई केली होती. जॉलीच्या खालोखाल २०१७ मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमात ‘काबिल’चा नंबर लागतो. काबिलची एकूण कमाई १७७.४६ कोटी एवढी होती. तर दुसरीकडे श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ‘ओके जानू’ या सिनेमाने पूर्णपणे निराशा केली. या सिनेमाने जगभरात फक्त ३९.१९ कोटींचीच कमाई केली होती.

‘जॉली एलएलबी २’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात शुक्रवारपर्यंत ८१.८५ कोटी तर भारताबाहेर २२ कोटींची कमाई केली होती. या सिनेमाला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. अर्थात प्रेक्षकांनी अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव त्या दिवशी केला होता असे म्हटले चुकीचे करणार नाही. कारण, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सिनेमाने तब्बल ९.०७ कोटींचा गल्ला कमविला होता. सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ सिनेमात अक्षय व्यतिरीक्त हुमा कुरेशी, अन्नु कपूर, यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘जॉली एलएलबी २’ची कथाही कोर्टातील एका केसभोवती गुंफण्यात आलीये.