आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनेत्रींना ओळखण्यामध्ये चूक होण्याच्या घटना बऱ्याचदा घडल्या आहेत. सध्या सुरु असणाऱ्या ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली आहे. एली साब या डिझायनरने डिझाइन केलेला हलक्या गुलाबी रंगाचा गाऊन घातलेली सोनम कपूर ज्यावेळी रेड कार्पेटवर आली त्यावेळी सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. पण, ‘अमेरिकन स्टॉक फोटो एजन्सी’ने मात्र सोनमचा फोटोला दीपिकाचं नाव देत गोंधळच घातला.

सोनम कपूर रेड कार्पेटवर येतानाचा हा फोटो दीपिकाच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर याच विषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय अभिनेत्रींच्या नावामध्ये असा गोंधळ घालण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही प्रियांका चोप्रा समजलं गेलं होतं. ‘मेट गाला’च्या कार्यक्रमापूर्वीच हा गोंधळ पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये काही लोक दीपिकाला हॅलो प्रियांका म्हणून तिचं स्वागत करत होते.

दीपिकाच्या हॉलिवूड पदार्पणाच्या वेळीही तिला प्रियांका म्हणून संबोधण्यात आलं होतं. हा सर्व प्रकार पाहता तिने पत्रकार परिषदेत कटू शब्दांत या घटनेला ‘वर्णभेदा’चं नाव दिलं. ‘ही फक्त एक प्रकारची टाळाटाळ नाहीये. तर हा वर्णभेदाचाच एक प्रकार झाला. एकसारख्या वर्णाच्या दोन व्यक्तींमध्ये साम्य कसं असू शकतं?’ असं ती म्हणाली होती. दीपिकाप्रमाणे प्रियांकानेही याआधी अभिनेत्रींना ओळखण्यामध्ये होणाऱ्या या गोंधळावर तिची प्रतिक्रिया दिली होती.