बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते. माध्यमांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रोखठोकपणे देणारी कंगना तिची मतं जगासमोर ठामपणे मांडते. यावेळी तिने धार्मिक गोष्टींबद्दल आत्मियता व्यक्त केली. आदित्य बिर्ला ग्रुपच्या लिव्हा क्रेमे लाँचमध्ये तिने रॅम्पवॉक केला. तसेच, त्यानंतर या अभिनेत्रीने माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली.

सध्या गायक सोनू निगमच्या ट्विटमुळे सुरु झालेला लाउडस्पीकवरून होणाऱ्या अजानवरील वाद चर्चेचा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणाबद्दल कंगनाला तिचे मत विचारण्यात आले. कंगना म्हणाली की, सोनू निगम जे काही म्हणाला ते त्याचं वैयक्तिक मत होतं आणि आपण त्याचा आदर करायला हवा. मी सर्वांबद्दल सांगू शकत नाही. पण, मला अजान ऐकायला आवडतं. ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटाचे आम्ही लखनऊमध्ये चित्रीकरण करत होतो. त्यावेळी स्वर्गीय आनंद देणारी अजान कानावर पडायचे. मला तो आवाज खूप आवडतो. मुळात गुरुद्वारा, भगवदगीता असो किंवा अजान मला सर्वच धार्मिक गोष्टी आवडतात. मंदिर, मस्जिद, चर्च या धार्मिक स्थळी मी जाते. एकंदरीतच धर्म आणि अध्यात्म यावर कंगनाचा विश्वास आहे.

सोनू निगमने अजान विरोधात सूर आळवत इतर धार्मिक स्थळी होणाऱ्या लाउडस्पीकरच्या आवाजावरही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सध्या त्याला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोनूने पुन्हा ट्विट करत त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला. ‘माझे ट्विट वाचून ज्यांना माझे वक्तव्य मुस्लिम धर्माच्या विरोधात वाटते त्यांनी ही बाबही लक्षात घ्यावी की, मी ट्विटमध्ये मंदिर आणि गुरुद्वाऱ्यामध्ये होणाऱ्या मोठ्या आवाजांचाही उल्लेख केला होता. ही गोष्ट लक्षात का घेतली जात नाहीये?’, असा प्रश्नही त्याने ट्विटमधून उपस्थित केला होता.