शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘लुंगी डान्स.. लुंगी डान्स’. रॅपर हनी सिंगने गायलेल्या या गाण्याने आजवर अनेकांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडलं. या गाण्याचे शब्द आणि ठेका पाहता नृत्याचा गंध नसणारेही एकदातरी त्यावर थिरकतातच. या धम्माल गाण्यापासूनच ‘लुंगी डान्स’ हा एक आगळावेगळा डान्स फॉर्म नावारुपास आला. मुख्य म्हणजे खुद्द कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीलाही या ‘लुंगी डान्स’चा मोह आवरला नाहीये. त्यामुळे धोनीने लुंगी डान्सचेही धडे गिरवले आहेत. हो… पण, तो शाहरुखकडून नृत्याचे धडे गिरवत नसून, डान्सगुरु प्रभुदेवाच्या पावलावर पाऊल ठेवून ठेका धरतो आहे.

क्रिकेट सामन्यांच्या तयारीसाठी बरीच मेहनत घेणारा धोनी विविध प्रकारच्या जाहिरातींसाठीही तितकाच वेळ देतो. अशाच एका ब्रॅण्डच्या जाहिरातीच्या निमित्ताने धोनीने चक्क नृत्य करण्याची तसदी घेतली आहे. धोनी नाचणार म्हटल्यावर त्याला नृत्यकलेचे धडे देण्यासाठी प्रभुदेवाही उत्साहाने पुढे सरसावला आहे.

प्रभुदेवा आणि धोनीचा हा ‘लुंगी डान्स’ सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे ऑनफिल्ड नेहमीच शांत राहणाऱ्या धोनीचा हा अनोखा अंदाज अनेकांनाच थक्क करतोय. त्याचा हा धम्माल डान्स पाहता दाक्षिणात्य रसिकांसाठी हे एक सरप्राइजच आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘एम. एस. धोनी फॅन्स’ या फेसबुक पेजवरुन प्रभुदेवा आणि धोनीच्या या ‘लुंगी डान्स’चा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे कॅप्टन कूलभोवती असणारं चाहत्यांचं वलय पाहता ‘फॅन्स से बचके कहा जाओगे…’ अशीच काहीशी त्याची अवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही.