सीबीएफसी प्रमुख पहलाज निहलानी सध्या त्यांच्या संस्कार गुणांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निहलानी यांनी सिनेमातील दारु आणि सिगरेटच्या दृश्यांवर बंदी आणली आहे. ‘द क्विंट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या दारु अथवा सिगरेटवरील दृश्यांवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यासही त्यांनी नापसंती दर्शवली होती. हा सिनेमा महिलांच्या मुद्यांवर आधारित असून ते आपल्या संस्कारांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

‘द क्विंट’सोबत बोलताना सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष म्हणाले की, ‘ज्या बॉलिवूड कलाकारांचे कोट्यवधी चाहते आहेत, अशा कलाकारांनी सिनेमांमध्ये सिगरेट किंवा दारु पिणारी दृश्य दाखवली तर प्रेक्षकांसमोर चांगले उदाहरण प्रस्थापित केले जाणार नाही.’ जेव्हा त्यांना विचारले गेले की, शाहरुखच्या ‘रईस’ सिनेमाची कथा दारु आणि अवैध व्यवसाय यावरच आधारित होती. तेव्हा अशा सिनेमांबाबतीत सेन्सॉर बोर्ड काय करेल, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा या सिनेमांना ए प्रमाणपत्र देण्यात येईल असे ते म्हणाले.

आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये पहलाज निहलानी यांची थट्टा उडवण्यात आली होती. या विरोधात निहलानी यांनी कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. निहलानी यांनी आरोप करत म्हटले की, एका अॅक्टमध्ये रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांनी त्यांच्या फोटोचा दुरुपयोग केला आणि त्यांना वॉचमेनही म्हटले. या नोटिसमध्ये आयफा आयोजकांनी निहलानी यांची माफी मागावी असे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचे विनोद भविष्यात केले जाणार नाहीत याची शाश्वतीही मागितली आहे. २०१६ मध्ये एका स्कीटमध्ये फरहान अख्तर आणि शाहिद कपूर यांनी निहलानींवर अपमानास्पद टिपणी केली होती आणि अशा गोष्टींवरही बंदी आणली पाहिजे असंही ते म्हणाले.