-अभिजीत खांडकेकर

आमची मालिका सुरू झाली आणि ठिकठिकाणी त्याबद्दल चर्चाही ऐकायला मिळाली. यामध्ये टीकाही होती आणि कौतुकही. मालिकेचे काही एपिसोड झाल्यानंतर मालिकेतल्या आम्हा कलाकारांना प्रेक्षकांची पावती मिळू लागली. पण या पावतीबरोबरच एक महत्त्वाचा विषय आमच्यासमोर आला आणि तो म्हणजे घरगुती हिंसाचार. मालिकेत राधिकाला जशी वागणूक दिली तशीच वागणूक समाजातील अनेक स्त्रियांना मिळतेय, हे सत्य प्रत्यक्ष अनुभवलं. राधिका साकारणाऱ्या अनिता दातेला बायका येऊन सांगायच्या, ‘तुम्हाला असं लढताना बघून आम्हाला बळ येतं. तुम्ही त्या गुरुनाथला असाच धडा शिकवा. खंबीर राहा. आम्ही आहोत तुमच्यासोबत. मुलं मोठी आहेत, तरी अजूनही नवरा मारहाण करतो, त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. यामुळे आमच्या संसारावर परिणाम होतोय.’ अशा आशयाची विधानं त्या करायच्या. त्यावेळी घरगुती हिंसाचार नावाचा काय राक्षस आहे हे प्रकर्षांने माझ्या लक्षात आलं.

अशिक्षित असो किंवा उच्चशिक्षित; घरगुती हिंसाचार हा बंद दरवाजाआड केला जाणारा प्रकार आहे. त्यामुळे तिथे कोणी नाक खुपसायला जात नाही. झोपडपट्टय़ांमध्ये आर्थिकदृषटय़ा मागास वर्गामध्ये हे प्रकार खुलेआम घडतात, कारण त्यांची घरंच मुळात लहान असतात. घरगुती हिंसाचाराला कोणत्याही प्रकारची पात्रता लागत नाही. ना शिक्षणाचा ना कमाईचा. ही न टाळता येण्याजोगी समस्या आहे. आत्तापर्यंत कॅज्युअल ड्रिंकिंगवर सहज बोललं जायचं नाही. पण आता बोललं जातं. ‘आमचे हे दारू पितात’ असं सहज मोकळेपणाने बोललं जायचं नाही. पुरुष मंडळीसुद्धा त्यावर भाष्य करत नव्हती. कारण सामाजिकदृष्टय़ा ते चुकीचं समजलं जायचं. प्रतिमा बदलली जायची वगैरे. पण आता या सगळ्याचा विचार न होता त्याबद्दल सहज बोललं जातं. जसं ड्रिंकिंगवर सहज बोललं जातं तसंच घरगुती हिंसाचार, विवाहबाह्य़ संबंधांवर आता सहज बोललं जातं. लोक सहज म्हणून जेव्हा फोटो काढायला येतात तेव्हा गमतीत का होईना, पण म्हणतात, ‘यांची पण एक शनाया आहे बरं का. तिला बघा कसा धडा शिकवते मी’ असं ती बायको सांगते. तर नवरेसुद्धा ‘बघा ना तुमच्या मालिकेमुळे ही माझ्यावर संशय घेते आणि विचारते तुमची शनाया कुठे?’ हे सगळं गमतीत होत असलं तरी त्यात झालेला बदल दुर्लक्ष करण्यासारखा बिलकूल नाही.

आपण जिथे राहतो त्या भागात घरगुती हिंसाचार असं काही होत नसेल असं आपल्याला वाटतं तर तो आपला गैरसमज असू शकतो. काही वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने मी पुण्यात राहत होतो. तिथे माझ्याच सोसायटीत वरच्या मजल्यावर एक माणूस त्याच्या बायकोला मारत होता. मी त्यांच्या घरी गेलो. त्या माणसाने खिडक्या वगैरे लावून अंधार केला होता. मी त्याला का मारतोस असं विचारलं. तो म्हणाला ते आमचं आम्ही बघून घेऊ. मी म्हटलं तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मला यायची इच्छाही नाहीये. तरीसुद्धा जे करताय ते चुकीचं आहे. आणि ते जर थांबवलं नाहीत तर मला पोलिसांना बोलवावं लागेल. मग ते जरा गडबडले. मी तिथून निघालो तर आजूबाजूचेही मला सांगायला लागले की, तुम्ही त्यात पडू नका. यांचे नेहमीचं आहे. ती त्यांची वैयक्तिक बाब असली तरी ते चुकीचं आहे हे कळतंय ना आपल्याला. मग शांत का राहायचं. बायको ही मारण्याची वस्तू नाहीये. रस्त्यात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर कोणी हात उचलला तरी आपण त्यांना थांबवायला जातो.
मध्यंतरी आपल्या सरकारने ‘बेल बजाओ’ हा जनजागृती कार्यक्रम सुरू केला होता. घरगुती हिंसाचार थांबवण्याठी हा उपक्रम होता. ज्यांच्या घरात असा प्रकार घडतोय त्यांची बेल वाजवा. जेणेकरून जो मारतोय त्याला कळेल की तो जे करतोय ते चार भिंतीच्या आत नसून बाहेरच्या लोकांनाही कळतंय आणि त्यांचं आपल्यावर लक्ष आहे. आणि त्यांना याची जरा तरी लाज वाटून ते हे करण्याचं टाळतील. घरगुती हिंसाचार या अतिशय गंभीर विषयाची एक छटा आम्ही मालिकेच्या माध्यमातून हलक्याफुलक्या पद्धतीने दाखवतोय. भलेही या मालिकेत माझी नकारात्मक भूमिका आहे, पण मी खऱ्या आयुष्यात माझ्या बायकोचा आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करतो. प्रत्येकाने तो करायलाच हवा. स्त्रियांचा आदर करणं ही अत्यंत गरजेची बाब बनत चालली आहे.

स्त्री दाक्षिण्याच्या शहरी व्याख्येबद्दल पुरुषांमध्ये काहीसा गोंधळ आहे, असं मला कधी कधी वाटतं. यापूर्वी स्त्री दाक्षिण्य म्हणून आपण काय काय करायचो तर स्त्रीसाठी दरवाजा उघडणं, स्त्रीच्या हातातलं सामान घेणं, कुठेही जायचं असेल तर पहिले तिला जाऊ देणं वगैरे. पण आता या गोष्टी आता लिंगभेदाच्या वादामुळे समजून घेण्यात गोंधळ होतोय. स्त्री दाक्षिण्य म्हणून एखाद्या स्त्रीला मदत करणं किंवा तशी वागणूक देणं हे तिला ती स्त्री आहे म्हणून वागवलं जातंय असं वाटेल की काय, अशी शंका मनात बाळगून काही पुरुष तसं करायलाच जात नाहीत. स्त्री-पुरुष बरोबरीने चालत असलो आणि दोन्ही लिंगांमध्ये भेदभाव करत नसलो तरीसुद्धा स्त्री म्हणून आदर करणं, तिचा सन्मान करणं हे आवश्यक आहे. हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. स्त्री म्हणून तिला कमी न लेखता तिचा आदर करायला हवा. लिंगभेद बाजूला ठेवून स्त्री दाक्षिण्य जपणं ही स्त्री दाक्षिण्याची आधुनिक व्याख्या होईल. मालिकेच्या निमित्ताने घरगुती हिंसाचार, स्त्री-पुरुष लिंगभेद, स्त्री-पुरुष समानता, स्त्री दाक्षिण्य याबाबतचे अत्यंत महत्त्वाचे विचार डोकावून गेले आणि बरंच काही शिकवूनही गेले.

(शब्दांकन : चैताली जोशी)
response.lokprabha@expressindia.com