“कोमल लागत नाही…” तो
“हो…” मी
“भराभर हवा भरते भात्यात पण स्वर काही उगवत नाही, म्हणून आणली दुरुस्तीला”
“हं…” सुस्कारा सोडत त्यानं हार्मोनियमला पाहिलं. त्यानं जोरजोरात भाता मारला
त्याच्या जाडभिंगाच्या चष्म्यातून न्याहाळत राहिला तो… स्वरपट्ट्यांना, आतल्या तारांना, तारपट्ट्यांवर फुंकर मारत म्हणाला, “ठेवून जाता का…?”
“लगेच नाही होणार का…?” मी
“अं…हं…” मान सकारात्मक हलली…
बरं… बघतो…
हार्मोनियमच्या दुकानात मी माझी पेटी दुरुस्तीला आणली होती, हा माझा तसा ओळखीचा… असाच संगीत सहवासातून झालेला मुंबईचा. मला त्याचं भारी अप्रूप वाटतं
पेटी आपण वाजवतो किंवा वाजवायचा प्रयत्न करतो पण हा ती बनवतो…
किती स्वरज्ञान असलं पाहिजे या गृहस्थाला नुसता स्वर दाबला तरी त्याला कळतं Tuned नाही म्हणून, मला कौतुकच.
त्यानं खलीता उघडावा, तशी पेटीची पुढची बाजू उघडली, त्याच्या चष्म्याच्या भिंगातून तो आत पाहू लागला.
“तुला आठवतो का रे मी…?”
“हो…हो… म्हणजे काय…” मी
“सगळं बदललं ना आता…” तो
“काय?” मी अंदाज घेत
नाही… असंच
तो जुनाट तारांना नखाने छेडून पाहतो
त्या तारांवरचा लालसर भुसभुशीत गंज निखळतो
“तू तिच्याशीच लग्न केलंस ना तुझं ते सामान… सॉरी तीच ना…” मी हसू दाबत म्हणालो
हो… तो
त्यानं तर्जनीच्या नखानं एक तार वर ओढली आणि आत फुंकर मारली, लाकडाचा भुसा बाहेर आला
‘ही’ बदलली… आत डोकावत तो म्हणाला
कोण ? मी
“ही… माझी बायको… सारखी भांडते. पोर होईस्तोवर नीट राहिली नंतर पलटीच मारली तिनं, राडा घरात सारखा… आता माझं असं आहे. हे तिला आधीपासूनच माहितीये ना…”
मग…?
ती म्हणते, “तुमच्या पेटीवर लोकांच्या मैफिली सजतात. तुम्ही बसा लाकडाच्या भुशात, सगळे पुढं निघून गेले तुम्ही बसले हे काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांची जुळणी करत.”
तिला काय सांगू. भल्याभल्यांना जमत नाही ते. माझ्याकडे येतात काळ्या-पांढऱ्या पट्ट्या जुळवून घ्यायला
त्यानं बोट फिरवली काही संवादी काही विसंवादी सूर ऐकू आले.
“ह्यांच असंच, त्यांच तसंय…, सारखा तराजूच लावलेला असतो तिनं…”
“दोस्ता, हे काचेच जग आल्यापासून पलीकडच्या घरातला लखलखता उजेड जसा लगेच डोळ्यात भरतो ना, तसा आपल्या घरातला अंधार मनाला डाचणी लावतो यार. मोठे-मोठे कलाकार माझ्याकडून करून घेतात पेटी हट्टाने… ही म्हणते पैसे किती आणले? हिला काय सांगू सुरात लागलेली पेटी वाजली की कशाचीच किंमत उरत नाही”
भात्यात हवा भरत तो बोलत होता…
त्याच्या छातीवरचे अर्धवट पांढऱे झालेले केस त्यावर घामाचे बारीक फुगे हलत होते.
त्यानं विजेरी लावून आत पाहिलं, पुन्हा बोलू लागला
“नीट बोलत नाही माझ्याशी. बाहेर असते दिवस-दिवस काही बोललं की सुरूच, लव्ह मॅरेज केलं ना, घटस्फोट घेऊन घरी जायची पण सोय नाही राहिली…”
छोट्या छोट्या गोष्टींवरून मंगळसूत्र काढून फेकते तोंडावर… मणी निखळतात… पूर्वी साधं घर होतं तेव्हा मणी सापडायचे रे… आता या नवीन आधुनिक टाईल्सवर नाहीत ना सापडत मणी… तडतडत कुठे निघून जातात कळत नाही या फरशांवर…
तुटलेलं मंगळसूत्र जोडलं तरी त्याची ओरिजनल मांडणी विस्कटलेलीच ना…
त्यानं मोठा भाता मारला…
ढोलकीवर मारावी तशी पेटीवर दोन्हीकडून थाप मारली…
“झाली… बघ वाजवून…” सुखावत तो म्हणाला
“तू केलीस ना… मग ओकेच असेल” मस्त हसला. पैसे नको मानेनच म्हणाला. लगेच दुसरी पेटी घेतली त्यानं दुरुस्तीला…
मी पेटी घेऊन निघालो, पण त्याच्या विस्कळीत झालेल्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्या मला सूरच लागू देईनात…
ता. क.
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं…
मिलिंद शिंदे