प्रेम…. प्रत्येकाच्या आय़ुष्यातील एक अविभाज्य भाग. तुम्ही कधी प्रेमात पडता हे कळतंही नाही. एखाद्या व्यक्तीवर मन जडल्यावर तीच व्यक्ती आणखी चारजणांना आवडत असल्याचं कळतं तेव्हा होणारं दुःख हे शब्दांत व्यक्त करता येण्यासारखं नसतं. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री दिप्ती भागवत हिला आला होता. ‘गाणे तुमचे आमचे’, ‘हृदया प्रित लागते’, ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमात झळकलेल्या या अभिनेत्रीचं पहिलं क्रश अपुरं राहिलं. पण नंतर तिच्या आयुष्यात आलेली व्यक्ती आयुष्यभरासाठी तिचा जोडीदार बनली. तिच्या आयुष्यात आलेलं हे प्रेमदेखील तिला सहजासहजी मिळालं नाही. त्याचा अनुभव स्वतः दिप्तीनेच ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितला.

मी कॉलेजमध्ये असताना ‘आभाळमाया’ मालिका लागायची. तेव्हा मला अभिनेता श्रेयस तळपदे खूप आवडायचा. त्याने मालिकेत कोणता शर्ट घातला, कोणता संवाद म्हटला यावर मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून चर्चा करायचो. पण, तेव्हा मी एकटीच त्याच्या प्रेमात नव्हते. माझ्या इतर चार मैत्रिणीही त्याच्यावर प्रेम करायच्या. त्यामुळे इथेच तो विभागला गेला, मग पुढे काय होईल हा विचार मनात आल्यावर वाईट वाटायचं. त्यानंतर मात्र माझ्या आयुष्यात आलेली व्यक्ती माझा जन्माचा जोडीदार बनली. मी एसएनडीटी कॉलेमध्ये शिकत असताना मुंबई विद्यापीठात साउंड रेकॉर्डिंग अॅण्ड रिप्रॉडक्शनचा कोर्स करत होते. तो कोर्स करत असतानाच मकरंद आणि माझी ओळख झाली. मकरंद उत्तम गायक आणि हार्मोनिअमवादक आहे. त्यावेळी तो मला इतका आवडत नव्हता. तरीही तो मुद्दाम माझ्यासमोर येऊन माझं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करायचा. एकदा तर मी ट्रेनमध्ये चढत असताना तो माझ्या मागे आला त्याने मला गिफ्ट दिलं. मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय असं तो म्हणाला. त्यावर मी काहीही विचार न करता ते गिफ्ट फेकून दिलं. त्यावेळी मी किती चुकीची वागले याची जाणीव मला नंतर झाली. माझ्या जोडीदाराच्या ज्या अपेक्षा आहेत तसाच तो आहे का? याबद्दल मी सुरुवातीला साशंक होते. एकतर मी पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यातही माझ्या घरच्या संस्कारांना साजेसा असा मुलगा मला हवा होता. पण, त्याला हिंदी बोलण्याची सवय असल्यामुळे तो माझ्या अपेक्षेप्रमाणे नाहीच असं मला वाटायचं. मुळात मकरंदचं संपूर्ण शिक्षण ग्वाल्हेरला झाल्यानं त्याला हिंदीत बोलण्याची सवय होती. या सगळ्या गोष्टी कालांतराने मला कळल्या. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि आमचे सूर जुळले.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com