‘वळू’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘विहीर’, ‘जन्म’, ‘लालबाग परळ’ असे चित्रपट असोत, किंवा ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एक रिकामी बाजू’, ‘दलपतसिंग येता गावा’, ‘खेळ मांडियेला’, ‘जंगल में मंगल’ यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्या् वीणाने व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजलेत. वीणा तिच्या कामाप्रमाणेच तिच्या क्रशबद्दलही तितकीच सजग आहे. आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्याबद्दल आपल्या मनात आदर असणं जास्त गरजेचं असतं. कारण तरुणवयात आपण कळत नकळतपणे ज्या माणसांना फॉलो करतो त्या माणसांमुळे आपल्या व्यक्तीमत्वावर फरक पडत असतो असं वीणाचं म्हणणं आहे. तर जाणून घेऊया वीणाच्या या ‘परफेक्ट’ क्रशबद्दल..

माझं ऑल टाइम क्रश म्हणजे राहुल द्रविड. त्याच्यात काही बदल नाही होऊ शकत. व्यक्तीश: ते पटण्यासारखं नाहीये कारण त्यात बदल होत जातात. पण क्रशमध्ये त्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा योग्य व्यक्तीवर ते होण गरजेचं असतं. कॉलेजमध्ये असताना तुम्ही कोणावरतरी भारावून जाता. एकदम आणि कळत नकळत त्या व्यक्तीला फॉलो करता. समजा त्याव वयात मी राहुल द्रविडची फॅन आहे आणि माझी मैत्रिण एखाद्या आघाडीच्या अभिनेत्याची फॅन आहे. दोघही जण हॉट अॅण्ड हॅण्डसम आहेत. तरुण, स्मार्ट आणि बॅचलर आहेत. आपापल्या क्षेत्रात काम छान करतात. त्या वयात स्वप्नच ही असतात की जो आवडतो त्याच्याशीच लग्न करायचं. ते एक क्रश असतं ज्याच्याशी आपल्याला लग्न करावसं वाटतं. त्या वयात आपल्याला कळत नसत. तेव्हा त्या कलाकाराच्या किंवा क्रिकेटरच्या आपण प्रेमात पडतो. पण जेव्हा आपण मागे वळून बघतो. तेव्हा मात्र, सामाजिक दृष्ट्या ती व्यक्ती किती चांगली आहे. त्याची बोलण्याची पद्धत, कामाची पद्धत, त्याचं आचरण याचा विचार करतो. मग आपल्याला कळतं की आपण कोणाच्या प्रेमात पडलो होतो. आपण जसंजसं मोठं होतो तेव्हा आपल्याला कळत जातं की हे पौगंडावस्थेतल क्रश असतं किंवा त्या वयातलं आकर्षण असतं. मग तेव्हा आपण विचार करतो की आपण कोणाच्या प्रेमात पडलो होतो? आता द्रविडचं लग्न झालं आणि माझही करियर झालं आहे. पण आजही मी जेव्हा जेव्हा राहुलला बोलताना बघते किंवा त्याच्या मुलाखती वाचते मला अभिमान वाटतो. मला क्रिकेट काही कळत नव्हतं. पण त्याचं सृजनशील असणं किंवा क्रिकेट खेळाला जास्त महत्त्व देणं, फिल्डच्या बाहेर वावरणं हे सगळं पाहून वाटायच की हा माणूस आत एक बाहेर एक असा नाहीये. ते फिलिंग मला आजही त्याच्याबद्दल वाटतं. याच आदाराने नंतर क्रशची जागा घेतली. असं वाटत की हा आपल्या क्षेत्राशी संबंधित नसूनसुद्धा मला नेहमी त्याच्याकडून प्रेरणा मिळत राहते. त्याच्यारखं लो प्रोफाइल राहूनसुद्धा काम चांगलं करावं. त्यामुळे मला वाटतं की तरुणवयात आपण कळत नकळतपणे ज्या माणसांना फॉलो करतो त्या माणसांमुळे आपल्या व्यक्तीमत्वावर फरक पडत असतो. अशा व्यक्तीचं अस्तित्व तुम्हाला बळ देत. काहीतरी चांगल करायला प्रवृत्त करतं. सो ही इज माय ऑल टाइम क्रश..

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com