वैभव तत्ववादी या अभिनेत्याला सिनेसृष्टीत येऊन साधारण पाचेक वर्षे झाली. इतक्या कमी कालावधीत या कलाकाराची झेप कौतुकास्पदच म्हणावी लागेल. मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट असा त्याचा प्रवास फार वेगाने झाला. वैभव खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला तो, ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटापासून. ‘हंटर’ या हिंदी चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेचीही दखल घेतली गेली. यानंतर त्याचे काही मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. २०१५ हे वर्ष वैभवसाठी चांगलं होतं. याचं कारण त्याचं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होतं. ‘हंटर’, ‘कॉफी..’ या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातल्या ‘चिमाजी अप्पा’ या भूमिकेसाठी सर्वांनीच त्याचे कौतुक केले. टेलिव्हिजनमधून करिअरची सुरुवात करणारा वैभव सध्या यशाची पायरी चढत आहे. लवकरच तो ‘प्रेम हे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रेमावर आधारित या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या वैभवच्या खऱ्या आयुष्यातही मालिकेप्रमाणेच एक किस्सा घडला होता. रुपेरी पडद्यावर कॉफी आणि बरंच काही म्हणणाऱ्या वैभवच्या खऱ्या आयुष्यात त्याची कॉफी डेट अधुरीच राहिली. त्याबद्दल स्वतः वैभवनेच सांगितलं.

माझ्या क्लास टीचर या माझ्या सगळ्यात पहिल्या क्रश होत्या. विशेष म्हणजे त्यासुद्धा माझ्या आईला तुमचा मुलगा माझा सगळ्यात मोठा चाहता आहे, असं सांगायच्या. त्या कधी शाळेत येणार नसतील तर मीसुद्धा शाळेत जाणं टाळायचो. त्यानंतर मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये दोनदा मला सोबतच्या मुलींबद्दल वेगळीच भावना मनात आली. पण, कधी कोणाला सांगण्याची माझी हिंमतच झाली नाही. त्यावेळी एक मुलगी माझ्यासोबत काम करायची आणि दुसरी माझ्यासोबत काम करत नव्हती. पण, दोघींसमोरही बोलण्याची माझी हिंमत झाली नाही. आम्ही कॉफी पिण्यासाठी भेटायचो पण मनातल्या भावना तेव्हा सांगता येत नव्हत्या. असंच एकदा आम्ही कॉफी प्यायला गेलो होतो. मला तिला काहीतरी सांगायचं होतं आणि मी तिला भलतंच काहीतरी सांगून आलो. तू मला आवडतेस असं मी तिला कधीच बोलू शकलो नाही. त्यानंतर ते राहूनच गेलं. मुळात मी प्रपोज करायला गेलो होतो. पण, मुख्य मुद्दा सोडून मी तिला गावभरच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावेळी मी तिला काही संकेत सुद्धा देण्याचे प्रयत्न केले. पण, ते तिला कळलेच नाहीत. मात्र, यामुळे माझा देवदास कधीच झाला नाही. मी आता ‘प्रेम हे’ मालिका करतोय. तर या मालिकेतील पात्राची आणि माझी कथा काहीशी सारखीच आहे, असं मला वाटतं. मालिकेत मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला ज्याप्रमाणे पटकन व्यक्त होता येत नव्हतं. त्याचप्रमाणे माझ्या खऱ्या आयुष्यातही सुरुवातीच्या ‘क्रश’समोर मला व्यक्त होता आलं नाही. कॉलेजमध्ये तर माझ्यासोबत असं बऱ्याचदा झालं. मी समोरच्या व्यक्तीला माझ्या भावना सांगण्यासाठी गेलो, त्या माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्नदेखील मी केला. मात्र, त्या समोरच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत.

चैताली गुरव; chaitali.gurav@indianexpress.com