सिनेमॅटोग्राफीची (छायांकन) आवड माझ्यात निर्माण झाली ती मी लहानपणापासून बघत असलेल्या सिनेमांमुळे आणि त्याविषयी मला वाटत असलेल्या कुतूहलामुळे. सिनेमात वापरलं जाणारं हे तंत्र मला त्याकडे खेचत होतं. सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे तिथे ‘दिसण्या’ला महत्त्व आहे. सिनेमाचा विषय, कथा, संवादातून पुढे सरकतेच. पण तो समजून त्याची दृश्यभाषा तयार करणे म्हणजे सिनेमॅटोग्राफी.

खरंतर मला एफटीआयआयमध्ये दिग्दर्शनासाठी प्रवेश मिळवायचा होता. तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर मी खूप आधीपासून साहाय्यक म्हणून काम करायचो. एका वर्षी तिथे फोटोग्राफीची एक कार्यशाळा आयोजित केली होती. तिला मी गेलो होतो. ज्यांना स्वत:चा फोटो स्टुडिओ काढायचा आहे अशांसाठी ती अगदी साधी कार्यशाळा होती. तिथे मला स्टील फोटोग्राफी शिकायला मिळाली. या कार्यशाळेनंतर मी काही लग्नांमध्येसुद्धा फोटो काढण्यासाठी गेलो होतो. तसंच काही नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या घरी काही कार्यक्रम असेल तर ते मला फोटो काढायला बोलवायचे. या कामामुळे माझं एकीकडे अर्थार्जन होत होतं.

दुसरीकडे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी याच्या ‘गिरणी’ या शॉर्टफिल्मसाठी मी त्याच्याबरोबर साहाय्यक म्हणून काम करत होतो. त्यावेळी मी कॅमेऱ्याजवळ त्याला बघत उभा राहायचो. त्याचं निरीक्षण करायचो. मला त्याबद्दल कुतूहल वाटायचं. त्यावेळी मी १५१६ वर्षांचा असेन. मी दिसायलाही तसा लहानच होतो. त्यामुळे मी असा विचार करायचो की, हा कॅमेरा मी उचलला तर मला पेलवेल का? खरंतर मला दिग्दर्शनासाठी तिथे प्रवेश हवा होता. पण माझं वय कमी पडत होतं. तेव्हा आपल्याला नीट बोलता येईल की नाही, याची खात्रीही नव्हती. या सगळ्या न्यूनगंडांतून मी त्यावेळी जात होतो. पण, मी या सगळ्याचा विचार काही वेळ थांबवून सिनेमॅटोग्राफी या तंत्राबद्दल विचार करू लागलो. तिथे असलेल्या कॅमेरा अटेंडण्टना मी ‘एफटीआयआयचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काय आणि कसं काम मिळतं. कॅमेरा अटेण्डंटना किती पैसे मिळतात’ वगैरे चौकशी केली होती. त्यानंतर मी माझ्यापुरती एक गोष्ट ठरवली होती. सिनेक्षेत्रातच असं काही करायचं की कधीच उपाशी राहावं लागणार नाही.

सिनेक्षेत्रातच काम करायचं असं पक्कं ठरवल्यामुळे त्यातलं तंत्रज्ञान शिकण्याचाही मी निर्णय घेतला. जेणेकरून आवडत्या क्षेत्रातही काम करता येईल आणि पैसेही मिळतील. दिग्दर्शकांना पैसे मिळत नाहीत असं मला म्हणायचं नाही; पण त्यांचा संघर्ष आणखी वेगळ्या पातळीवरचा असतो. आणि म्हणूनच एफटीआयआयमध्ये सिनेमॅटोग्राफीसाठी प्रवेश घेण्याचं मी ठरवलं. त्यानंतर एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आणि त्यानंतर सिनेक्षेत्रात त्या दृष्टीने माझा प्रवास सुरू झाला.

सिनेमॅटोग्राफी हे फोटोग्राफीचं विस्तारित रूप नाही. काही लोकांची ही चुकीची समजूत आहे. फोटोग्राफी हा सिनेमॅटोग्राफीचा एक घटक आहे. सिनेमाचा विषय, कथा, वेग, प्रवाह हे सगळं समजून घेऊन बजेटचा विचार करताना सिनेमा कुठे शुट करायचा याची ठिकाणं ठरवणे अशा वेगवेगळ्या धर्तीवर सिनेमॅटोग्राफीचा विचार केला जातो.

संतोष सिवन यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेली सिनेमॅटोग्राफी मला सगळ्यात पहिल्यांदा भावली. त्यांचं काम बघून मी भारावून गेलो. माझ्या बालपणी माझ्यासाठी ते प्रेरणादायी ठरलं होतं. संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी आणि मणिरत्नम यांचं दिग्दर्शन असे सिनेमे बघणं म्हणजे सिनेमाचा अभ्यास करणं आहे. सिवन यांचं काम बघूनच मला सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय हे नीट कळायला लागलं. मी साधारण चौथीपाचवीत असताना त्यांचं नाव माझ्या कानावर आलं होतं. त्यानंतर मी त्यांचे सिनेमे बघायला लागलो.

सिवन यांच्याबरोबरच मी वेगवेगळ्या सिनेमॅटोग्राफर्सचे वेगवेगळे सिनेमे बघायला लागलो. जुने, नवे, विविध भाषांतले सिनेमे मी बघू लागलो. त्यातली सिनेमॅटोग्राफी समजून घेऊ लागलो. प्रत्येक दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफरचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. वेगवेगळे सिनेमे बघण्याची सवय लागल्यामुळे मला अनेक सिनेमॅटोग्राफर्सची माहिती कळू लागली. मुघलआझम सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर आर. डी. माथुर, गाईड सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर फली मिस्त्री, राज कपूर यांच्या अनेक सिनेमांचे सिनेमॅटोग्राफर राधू करमाकर, सामना सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर सूर्यकांत लवांदे, गुरुदत्त यांच्या सिनेमांचे सिनेमॅटोग्राफर वी. के मूर्ती अशा अनेकांचे अनेक सिनेमे मी बघायचो. बिनोद प्रधान, अशोक मेहता या सिनेमॅटोग्राफर्सचेही सिनेमे बघत खूप शिकलो. एफटीआयमध्ये असताना मी सिनेमॅटोग्राफर्सचा चालताबोलता विकीपिडीया होतो. याचा मलाच नकळतपणे फायदा व्हायचा. हे सिनेमे बघता बघता सिनेमॅटोग्राफी करण्याचा मला आत्मविश्वास मिळाला आणि ठामपणे वाटलं की आता सिनेमॅटोग्राफीसाठी अ‍ॅडमिशन घ्यावी. एफटीआयआयमध्ये अनेक सिनेमॅटोग्राफर कार्यशाळा घ्यायचे. त्यांच्याकडून वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन मिळालं. त्यांच्या कामाच्या पद्धतीचं मी निरीक्षण करायचो. या सगळ्याचा मला एफटीआयआयमधून बाहेर पडल्यावर करिअरच्या सुरुवातीला फायदा झाला. मसान, मदारी, किल्ला, दृश्यम असे उत्तम दर्जाचे सिनेमे मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला करायला मिळाले.

सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे तिथे दृश्यांनाही महत्त्व आहेच. सिनेमाचा विषय समजून घेऊन तो दृश्यांमधून सांगण्याचं काम सिनेमॅटोग्राफी करते. प्रत्येक दिग्दर्शकाचा, भाषांचा, सिनेमांचा वेगवेगळा फॉर्म असतो. यात चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं. पण मला वाटतं, सिनेमातल्या भावना प्रेक्षकांपर्यंत शांतपणे, सहज पोहोचवायला हव्या. त्यांचं अतिरंजित सादरीकरण, झगमगाट, भव्यता यामध्ये सिनेमाची साधी गोष्ट लपून जाते. सिनेमाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचायला हवी, अशी माझी सिनेमाविषयक समज आहे.

सिनेमाच्या वेगवेगळ्या घटकांमधला सिनेमॅटोग्राफी हा एक घटक आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, तंत्रज्ञान, सिनेमॅटोग्राफी असं सगळं मिळून एक चांगला सिनेमा तयार होतो. हे सगळं मला लहानपणापासून बघत आलेल्या सिनेमांमुळे समजलं. हा अनुभवसुद्धा माझ्यासाठी एक अभ्यासच होता.

response.lokprabha@expressindia.com, @avinasharun20
(
शब्दांकन : चैताली जोशी)
सौजन्य लोकप्रभा