हॉलिवूडमध्ये चित्रपटांचे विषय हाताळताना त्यात काहीसा बोल्डपणा दाखवला जातो ही बाब आता कोणीही नाकारु शकत नाही. किंबहुना चित्रपट रसिकांनीही या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. हॉलिवूडमधील अशाच एका दिग्दर्शकाच्या मुलाखतीमुळे सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या भोवऱ्यामध्ये दिग्दर्शक बर्नार्डो बर्तोलुची यांच्यावर टीकेची झोडही उठविण्यात येत आहे. काही काळापूर्वी त्यांनी दिलेल्या मुलाखतीतील माहिती समोर आल्यामुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच अनेकांनी बर्नाडो यांच्याविरोधात आवाज उठवला आहे.

‘लास्ट टँगो इन पॅरिस’ या चित्रपटातील अभिनेत्री मारिया शिनाइटर हिच्या परनावगीशिवायच, ती अनभिज्ञ असताना चित्रपटातील बलात्काराच्या दृश्याचे चित्रीकरण केले होते असा खुलासा बर्नाडो यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बर्तोलुची यांनी या दृश्याबद्दल त्या अभिनेत्रीला काहीही कल्पना दिली नव्हती. त्या अभिनेत्रीला हेसुद्धा ठाऊक नव्हते की तिला मार्लोन ब्रॅण्डोसोबत बलात्काराच्या दृश्याचे चित्रीकरण करायचे होते. बर्नाडोच्या या मुलाखतीच्या एका फितीमध्ये ते बोलताहेत की, ‘मी मारियासोबत काहीसा रागीने वागलो कारण त्या ठिकाणी काय सुरु आहे हे तिला हे कळून द्यायचे नव्हते. एका अभिनेत्रीप्रमाणे नाही तर, एका घाबरलेल्या मुलीप्रमाणे मारियाच्या चेहऱ्यावरचे भाव हवे होते यासाठी आपण असे केल्याचे बर्नाडो यांनी सांगितले.

अभिनेत्री मारियाचे ३ फेब्रुवारी २०११ ला निधन झाले. दरम्यान, बर्नाडो बर्तोलुची यांच्या या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगलीच दाद दिली होती. समीक्षकांची दाद मिळवूनही या चित्रपटाला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अश्लील दृश्ये दाखवण्याच्या वादावरुन या चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर टिकाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बर्नाडो बर्तोलुची यांना कायदेशीर कारवायांचा सामनाही करावा लागला होता ज्यामुळे त्यांना काही दिवसांच्या कारावासची शिक्षाही झाली. तसेच, त्यांचे नागरी अधिकारही काढून घेण्यात आले होते. या वादग्रस्त चित्रपटासाठी अभिनेता ब्रॅण्डोला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि बर्तोलुचींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारांसाठी नामांकनही मिळाले होते.