प्रदर्शनाआधीच त्यातील दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेल्या ‘उडता पंजाब’ या आगामी चिपत्रपटाला १३ कट्स आणि ‘अ’ प्रमाणपत्रासह प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी परवानगी दिली आहे. ‘उडता पंजाब’वर आक्षेप घेत चित्रपटात तब्बल ८९ कट्स सुचविल्याने पहलाज निहलानींविरोधात बॉलीवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांनी मोठी आघाडी उघडली होती. निहलानींच्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. तसेच हे प्रकरण न्यायालयात देखील पोहोचले. गेल्या आठवडाभराच्या वादावादीनंतर निहलानी यांनी अखेर रविवारी ‘उडता पंजाब’मधील १३ दृश्यांना कात्री लावत प्रदर्शनाला परवानगी दिली.

दरम्यान, या प्रकरणावर आज होणाऱया न्यायालयीन सुनावणीवर साऱयांचे लक्ष असणार आहे. चित्रपट प्रमाणित करणे हे तुमचे काम आहे तो सेन्सॉर करणे नव्हे. त्यामुळे काय पाहायचं काय नाही हे लोकांना ठरवू द्या, असे सुनावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या वादावरून सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी कारभारावर टीका केली होती. त्यामुळे न्यायालय आज नेमका कोणता निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.