‘द डॅनिश गर्ल’सह इतर चित्रपटांना फटका

मनोरंजन उद्योगाची वार्षिक उलाढाल तपासणारी, त्याचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवणारी ‘फिक्की फ्रेम्स’ परिषद संपून अवघा आठवडा उलटायच्या आतच पुन्हा एकदा ज्या सेन्सॉरशीपबद्दल तमाम उद्योगधुरिणांनी आपली नाराजी या परिषदेत व्यक्त केली होती. त्याच सेन्सॉरने आपला बडगा पुन्हा उचलला. ‘द डॅनिश गर्ल’ या ऑस्करसाठी नामांकन मिळवलेल्या आणि भारतातही रितसर प्रदर्शित झालेला चित्रपट टीव्हीवर प्रक्षेपित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डने नकार दिला. त्यामुळे रविवारी जे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते, त्यांच्या इच्छा सेन्सॉरने अपूर्ण ठेवल्या. ‘द डॅनिश गर्ल’ हा चित्रपट निदान ‘अ’  प्रमाणपत्र घेऊन प्रदर्शित तरी झाला होता मात्र चांगल्या हॉलीवुडपटांना सेन्सॉरने कात्रीत अडकवून घरी परतायला भाग पाडले आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

गेले महिनाभर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटालाही प्रदर्शनाची परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर चहूबाजूंनीटीका होते आहे. ‘फिक्की फ्रेम्स’मध्येही यावर्षी आर्थिक उलाढाल मोजण्यापेक्षा या क्षेत्रातील कर्त्यां-धर्त्यांनी सेन्सॉरशीपच्या अजब कारभाराबद्दल असंतोष व्यक्त केला. मात्र याचा काडीमात्र परिणाम पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखाली कारभार करणाऱ्या सेन्सॉर बोर्डावर झालेला दिसत नाही. ‘द डॅनिश गर्ल’ हा चित्रपट लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या लिली एल्बच्या आत्मचरित्रावर ‘मॅन इन्टु वुमन’वर आधारित होता. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियांना सामोऱ्या जाणाऱ्या सुरूवातीच्या काहीजणांपैकी लिली एक होती आणि शस्त्रक्रिया पूर्ण होण्याआधीच तिचा मृत्यू झाला, मात्र त्याने या शस्त्रक्रियेविषयी रोजनिशी लिहून ठेवली होती. या सगळ्याच्या आधारावर उभा राहिलेल्या ‘द डॅनिश गर्ल’चा आशय सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांच्या पचनी पडलेला नाही. टीव्हीवर लहान मुलांसाठी असा आशय दाखवणे गैर असल्याचे सांगत या चित्रपटाचे प्रक्षेपण ऐनवेळी नाकारण्यात आले. गेल्यावर्षीच्या जानेवारीत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाला प्रौढ प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यामुळे हा चित्रपट टीव्हीवर दाखवण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही निर्मात्यांच्या आग्रहावरून हा चित्रपट बोर्डाच्या सदस्यांनी पुन्हा पाहिला. मात्र त्यातील आशय टीव्हीवर दाखवण्याजोगा नसल्याचाच सूर आळवत निहलानींनी चित्रपटप्रेमींची निराशा केली आहे.

चुंबनदृश्यांना कात्री

‘द डॅनिश गर्ल’ हा चित्रपट निदान इथे प्रदर्शित तरी झाला होता; मात्र अनेक हॉलीवुडपटांना सेन्सॉर बोर्डाने घरचा रस्ता दाखवला आहे. प्रख्यात दिग्दर्शक वुडी अ‍ॅलन यांच्या ‘ब्ल्यू जॅस्मिन’चा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. या चित्रपटात जिथे जिथे धूम्रपान असेल तिथे वैधानिक इशारा दाखवला जावा, असा फतवा सेन्सॉर बोर्डाने काढला; परंतु अ‍ॅलन यांनी चित्रपटात अशा पद्धतीने वैधानिक इशारा दाखवण्यास नकार दिल्याने चित्रपटाला बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले नाही. परिणामी हा चित्रपट इथे प्रदर्शितच झाला नाही. लैंगिक दृश्यांचा भडिमार असल्याचे कारण ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ हा हॉलीवुडपटही सेन्सॉर होऊ शकला नाही. रॉबर्ट डी निरो यांचा ‘डर्टी ग्रँडपा’, ‘गेट हार्ड’ हा प्रौढ विनोदीपट हेही सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्याने इथे प्रदर्शित होऊ शकले नाहीत. ‘स्पेक्टर’सारख्या बाँडपटालाही त्याची ओळख असलेल्या चुंबनदृश्याला कात्री लावावी लागली तेव्हा कुठे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]