अभिनेता आमिर खानची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘दंगल’ या चित्रपटाबद्लची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव जरी ‘दंगल’ असले तरीही सेन्सॉर बोर्डासमोर या चित्रपटाला कोणत्याही प्रकारची दंगल करवी लागली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘सीबीएफसी’ म्हणजेच सेन्सॉर बोर्डाने नुकतेच या चित्रटाला ‘यू’ प्रमाणपत्र देऊ केले आहे. त्यामुळे ‘ऑल क्लिअर’ ठरवत या चित्रपटातील कोणत्याही दृश्याला कोणत्याही प्रकारची कात्री लावण्यात आलेली नाही. म्हणूनच मिस्टर परफेक्शनिस्टचा ‘दंगल’ हा चित्रपट सेन्सॉरच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरला आहे असेच म्हणावे लागेल.

पाहा: आमिरच्या मुलींचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

कोणत्याही चित्रपटाच्या बाबतीत सेन्सॉर बोर्डाचे निर्णय पाहता इतक्या सहजासहजी आमिरच्या या चित्रपटाला ‘यू’ प्रमाणपत्र मिळणे ही प्रशंसनीय बाब आहे. महिला सबलीकरणाचा एक चांगला संदेश या चित्रपटाद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे ‘दंगल’ या चित्रपटापुढे सेन्सॉरच्या कात्रीची धारही बोथट झाली आहे असेच दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाला प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेमध्ये सेन्सॉरला कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही. हा चित्रपट पाहिल्यावर सेन्सॉरच्या सदस्यांनीसुद्धा चित्रपटाची प्रशंसा केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. आपल्या मुलींना कुस्तीसारख्या पुरुषी खेळामध्ये तरबेज बनवण्यासाठी आणि याच खेळामध्ये भविष्य घडवण्यासाठी मुलींना प्रोत्साहन देणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेत आमिर दिसणार आहे.

सध्या विविध मार्गांनी या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये ‘दंगल’चे सर्वच कलाकार व्यग्र आहेत. पण, प्रसिद्धीचा मुख्य स्त्रोत मानल्या जाणाऱ्या टेलिव्हीजन कार्यक्रमांच्या माध्यमातून मात्र या चित्रपटाचे प्रमोशन केले जात नाहीये. ‘दंगल’च्या प्रसिद्धीसाठी या चित्रपटाच्या मेकिंगचे काही व्हिडिओ, आमिरच्या व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आणि अशा हटके मार्गांचा अवलंब करत ‘दंगल’ या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आमिरने साकारलेली महत्त्वाकांक्षी वडिलांची भूमिका प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.