देशभरातील चित्रगृहांत शुक्रवारपासून ‘न्यूटन’ प्रयोग रंगवणाऱ्या अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकासाठी शुक्रवारचा दिवस हा दुग्धशर्करा योग ठरला. चित्रपटाचे व्यावसायिकरीत्या प्रदर्शन आणि त्याच दिवशी ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट म्हणून ‘न्यूटन’ची निवड झाल्याची घोषणा या दोन घटनांनी दिग्दर्शक म्हणून त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी केंद्र सरकारने १ कोटी रुपयांचे अनुदान जाहिर केले आहे. एका चांगल्या आणि आशयप्रधान चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान देण्यात आल्याचे, निवड समितीचे अध्यक्ष सी व्ही रेड्डी यांनी म्हटले.

वाचा : Newton Review समाज‘व्यवस्थे’ची रंगतदार सर्कस

एकूण २६ चित्रपटांमधून ‘न्यूटन’ या चित्रपटाला ‘ऑस्कर’साठी पाठवण्याचा निर्णय ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या निवड समितीने घेतला. या चित्रपटांमध्ये १२ हिंदी, ५ मराठी, तेलगू, कन्नड, बंगाली, मल्यालमधील प्रत्येकी दोन आणि एका तमिळ चित्रपटाचा समावेश होता.

वाचा : बिग बी, अक्षय कुमारकडून ‘न्यूटन’चं कौतुक

दिग्दर्शक अमित मसूरकरचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी ‘सुलेमानी कीडा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘शाहीद’, ‘सिटीलाईट’सारखे आशयघन चित्रपट करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव याने या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. ‘न्यूटन’ हा आमच्यासाठी खूप वेगळा चित्रपट आहे. कुठलेही व्यावसायिक आडाखे न बांधता केलेला हा चित्रपट आहे. समीक्षकांसह अनेकांनी चित्रपटाला उचलून धरले आहे. आता हे यश तिकीटबारीवरही परावर्तित व्हायला हवे, अशी इच्छा राजकुमारने व्यक्त केली. तर या चित्रपटाचे निर्माता आनंद एल. राय यांनीही चांगला चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. एक निर्माता म्हणून आपण या प्रक्रियेत सहभागी होऊ शकलो, याबद्दल आनंद व्यक्त करत ‘न्यूटन’ला अपेक्षित असा सन्मान मिळाला आहे. हा चित्रपट अजून उंचावर जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी परभाषिक चित्रपट विभागात ‘न्यूटन’ला स्वीडनचा ‘द स्क्वायर’, जर्मनीचा ‘इन द फेड’, कंबोडियाचा ‘फस्र्ट दे किल्ड माय फादर’ आणि पाकिस्तानच्या ‘सावन’ या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे.