सामान्यतः अभिनय करायचा, हे तर अनेकांचेच स्वप्न असते. पण त्यात अनेकांना मालिका आणि त्यातूनही चित्रपटांमध्येच अभिनय करण्यात अधिक स्वारस्य असते. क्रिकेटमध्ये जसे टेस्ट मॅचमध्ये खेळाडूची गुणवत्ता कळते, अभिनयाचेही काहीसे तसेच आहे. खरी गुणवत्ता ही रंगभूमीवर दिसून येते. या रंगभूमीवरीलच एक कलाकार म्हणजे भाऊ कदम.

खरंतर हे नाव ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे सर्वांच्याच अधिक परिचयाच झाले आहे. भाऊ सध्या या कार्यक्रमासोबत काही चित्रपटांचे चित्रीकरण आणि नाटकांमध्येही काम करतोय. भाऊ कदम हे आजच्या घडीला मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. बॉक्स ऑफिसवर भाऊच्या चित्रपटाने आजवर अनेक विक्रम केलेत. मात्र, त्याने आता स्वतः एक विक्रम केला असून, त्यासाठी सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. एका दिवसात नाटकाचे सलग चार प्रयोग करण्याचा विक्रम त्याने केलाय.

वाचा : ‘निर्मात्यांसोबत ‘ते’ करण्यास तयार होणाऱ्या स्त्रियांचा मला राग येतो’

१ ऑक्टोबरला भाऊने एकाच दिवशी दोन नाटकांचे ४ प्रयोग केले. हा एक विक्रम असून त्यासाठी सगळेच भाऊचे कौतुक करत आहेत. एका दिवसात ४ प्रयोग करण्याची भाऊची तिसरी वेळ आहे. विजय केंकरे दिग्दर्शित ‘शांतेचे कार्ट चालू आहे’ या नाटकाचे ३ प्रयोग तर पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाचा १ असे मिळून एकूण त्याने चार प्रयोग एकाच दिवसात केले. ‘चला हवा येऊ द्या’चे पुढील काही भागांसाठीचे चित्रीकरण नुकतेच दुबईत करण्यात आले. भाऊ देखील त्याच्या टीमसोबत दुबईलाच होता. पण त्यातूनही वेळ काढून त्याने एकाच दिवसात ४ प्रयोग केले.

वाचा : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधून शंकर-एहसान-लॉयची माघार, अजय-अतुलकडे जबाबदारी

एका मुलाखतीत आपल्या भूमिकांविषयी भाऊ म्हणालेला की, विनोदामुळे दु:ख हलके होते. मी गंभीर भूमिका केल्यास प्रेक्षकांनाही आवडणार नाही. घरात असताना मी विनोदी नसतो, मित्रांमध्ये असतो. लहानपणी अभंग, व्याख्याने ऐकायचो, त्याचा पुढे उपयोग झाला. महिलांचे पात्र सादर करताना बरीच कसरत करावी लागते. शांताबाईचे पात्र बरेच गाजले. मात्र, आता ते नकोसे वाटते. आजी वारली, तेव्हा दु:खात असतानाही विनोदी प्रसंग सादर करावे लागले. मी कुणीतरी व्हावे ही वडिलांची इच्छा होती. आजची प्रगती पाहण्यासाठी ते नाहीत, हे सांगताना भाऊ भावूक झाला.