चित्रकार वासुदेव कामत यांनी रेखाटलेल्या ‘चाणक्य’ चित्राचा लिलाव

अभिनेते मनोज जोशी यांच्या ‘चाणक्य’या नाटकाचा ६९६ वा प्रयोग येत्या २ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. हिंदी व गुजराथी रंगभूमीवर या नाटकाचे प्रयोग आत्तापर्यंत झाले आहेत.

या नाटकाचा पहिला प्रयोग  १९८९ मध्ये सादर झाला होता. यंदा  ‘चाणक्य’ नाटकाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षीच्या सुरुवातीला नाटकाच्या सादर झालेल्या प्रयोगाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी नाटकाचा प्रयोग सुरु असताना ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी ‘चाणक्य’चे चित्र रेखाटले होते.  दीनानाथ नाटय़गृहात होणाऱ्या प्रयोगाच्या वेळी कामत यांनी रेखाटलेल्या या चित्राचा लिलाव करण्यात येणार आहे.

या लिलावातून मिळालेली सर्व रक्कम उरी येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीकडे सुपूर्द केली जाणार आहे. तसेच नाटकाची निर्मिती संस्था धर्मजम प्रॉडक्षन व वासुदेव कामत यांच्याकडून प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदतही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली जाणार आहे, तसेच नाटकाच्या प्रयोगादरम्यान स्वत: अभिनेते मनोज जोशी प्रेक्षकांमध्ये झोळी फिरविणार असून त्यात जमा होणारी रक्कमही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली जाणार आहे. ही मदत धनादेशाद्वारे देण्यात यावी असे आवाहन अभिनेते मनोज जोशी यांनी केले आहे.