अभिनेता इमरान हाश्मी आता निर्माता बनला आहे. ‘कॅप्टन नवाब’ या सिनेमातून तो निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. इमरानने ट्विटवर या सिनेमाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे.
या पोस्टरमध्ये तो एका सैनिकाच्या वेशात दिसत आहे. या पोस्टरमधली सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे यात त्याने पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांच्या सैनिकाचा पोशाख घातला आहे. त्यामुळे सिनेमा नक्की कशावर भाष्य करतो याबद्दल उत्सुकता वाढली आहे. या पोस्टरवर ‘दोन देश एक सैनिक’ असा संदेशही लिहिला आहे.
‘राज’ या भयपटाचा पुढचा भाग ‘राज रिबूट’मध्येही इमरान हाश्मी दिसणार आहे. यावेळी इमरान हाश्मी बरोबर दाक्षिणात्य सिनेमांची अभिनेत्री कृती खरबमदाही दिसणार आहे. तर ‘लव्ह गेम्स’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलेला अभिनेता गौरव अरोडाचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भयपट बनवण्यात हातखंडा असलेले विक्रम भट यांच्या दिग्दर्शनामध्ये हा सिनेमा बनवण्यात आला आहे. येत्या १६ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
‘राज रिबूट’च्याआधी राजचे तीन सिनेमे येऊन गेले आहेत. ‘राज’ मालिकेतला सगळ्यात पहिला सिनेमा ‘राज’ २००२ मध्ये आलेला. यात बिपाशा बासू आणि दिनू मोर्या होते. यानंतर २००९ मध्ये ‘राजः द मिस्ट्री कन्टिन्यूज’ हा सिनेमा आला. यात कंगना रानौत, इमरान हाश्मी आणि अध्ययन सुमन यांची महत्त्वाची भूमिका होती. २०१३ मध्ये ‘राज ३’ हा सिनेमा प्रदर्शित झालेला. यातही इमरान हाश्मी याची मुख्य भूमिका होती. इमरान हाश्मी बरोबर या सिनेमात बिपाशा बासू आणि ईशा गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या तीनही सिनेमांमध्ये सगळ्यात यशस्वी सिनेमा हा फक्त ‘राज’च राहिला आहे.