किंग खान शाहरुखच्या गाजलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाचा निर्माता करीम मोरानी याच्याविरोधात आज बुधवारी हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि ब्लकमेलप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

चित्रपट निर्माता करीम मोरानी याच्याविरोधात दिल्लीतील एका विद्यार्थिनीने गेल्या आठवड्यात हैदराबाद येथील हयातनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
करीम मोरानीने चेन्नई एक्स्प्रेस, दम, रा. वन आणि योद्धा आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. शाहरुख खानच्या दिलवाले या सिनेमाचाही तो सह-निर्माता होता.

मोरानीचे नाव २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातही समोर आले होते. तेव्हा त्याला सीबीआयने अटकही केली होती. तसेच २०१४ मध्ये मोरानीच्या घरावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. त्यादरम्यान त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मोरानीची मुलगी झोयाही अभिनेत्री आहे.