अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तसेच  ओम श्री संकल्प फिल्म प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या किरण नाकती दिग्दर्शित “सिंड्रेला” सिनेमावर प्रदर्शनाआधीच जगभरातून कौतुकाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे.
“सिंड्रेला’ सिनेमाची अधिकृत निवड यंदाच्या “साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल” (SCUFF) मध्ये करण्यात आली होती त्यानंतर लगेचच अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यशाची अशी ही घोडदौड सुरु असताना आता नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या  “इंडी फेस्ट” या अमेरिकेतील मानाच्या फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरी विभगात बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट फिल्मचा अवॉर्ड ही “सिंड्रेला” सिनेमाला मिळाला आहे.
“सिंड्रेला” या नावातच या सिनेमाचे एक वेगळेपण असून या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा पहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या अभिनय कट्ट्याच्या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक या सिनेमात दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता मंगेश देसाईने एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही आपल्याला पहायला मिळणार आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. “सिंड्रेला” सिनेमा येत्या ४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.