येत्या शनिवारपासून (२ फेब्रुवारी) सुरू होणारा ‘काळा घोडा महोत्सव’ म्हणजे कलाकारांसाठी पर्वणी असते. काचेच्या तुकडय़ांपासून ते बाटलीच्या बुचापर्यंत अनेक टाकाऊ गोष्टींमधून काहीतरी अफलातून प्रकार घडवणाऱ्या कलाकारांमुळे सामान्य रसिकांसाठी हा महोत्सव नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. गेल्या वर्षी या महोत्सवातील एका कावळ्याने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले होते. तो ‘कावळा’ बनवणारा तरुण कलाकार सुमित पाटील यंदा ‘भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी’निमित्त असेच एक ‘इन्स्टॉलेशन’ सादर करत आहे. या कलाकृतीत चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा भव्य पुतळा, चित्रपटाची भाषा म्हणून ओळखला जाणारा कॅमेरा आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या प्रतिकृती यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही काहीतरी हटके करण्याचा माझा विचार होता. त्यासाठी मग ‘भारतीय चित्रपटाची शंभरी’ हा विषय हाती घेतला. शंभर वर्षांचा इतिहास कलाकृतीतून कसा मांडणार, हा प्रश्न होता. मग मी कॅमेऱ्याची मदत घेतली. कॅमेऱ्यामागे राहून या चित्रपटसृष्टीत खूप मोठी कामगिरी बजावणाऱ्या अनेक तंत्रज्ञ, कलावंत यांचे चेहेरे १५ फूट बाय ९ फूट एवढय़ा मोठय़ा कॅमेऱ्यावर रेखाटले. त्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधील ९ फुटी पुतळाही तयार केला. तरुणांना या ‘इन्स्टॉलेशन’मध्ये आकर्षण वाटावे, यासाठी आपण सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीत गाजणाऱ्या कलाकारांचे ‘कटआऊट्स’ही तयार केले असे  असे सुमितने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या इन्स्टॉलेशनमध्ये सुमितने राज कपूर, नर्गिस, हेमामालिनी, अमिताभ बच्चन अशा दिग्गज कलाकारांबरोबरच शाहरूख, आमीर, सलमान ही खान त्रयी, अजय देवगण, करिना कपूर, दीपिका पडुकोण, विद्या बालन, अजय देवगण, प्रियांका चोप्रा, शाहीद कपूर अशा अनेक कलाकारांचे कटआऊट्स तयार केले आहेत. त्याशिवाय मराठी कलाकारांचे एक रिळही त्याने तयार केले आहे. यासाठी सुमितसह आशीष पालवणकर, नंदकिशोर खेडेकर, प्रणित पोळेकर, शानी सोनावणे, धनेश रणदिवे, संदेश कदम, महेश गाढवे, सागर चव्हाण, किशोर पाटील, रविकिरण शिलवलकर, अश्विनी शर्मा, संकल्पना पारकर, उदय मोहिते हे सर्वच कलाकार सप्टेंबर महिन्यापासूनच तयारी करत होते. हा सर्व पसारा उभारण्यासाठी सुमितला तब्बल दीड लाख रुपये खर्च आला आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी येणाऱ्या रसिकांसाठी सुमित खास ‘रेड कार्पेट’ अंथरणार आहे. पडद्यावरील कलाकार मोठे होतात ते त्यांच्या चाहत्यांमुळेच. त्यामुळे या सर्व चाहत्यांना ‘रेड कार्पेट’चा बहुमान द्यायलाच हवे, असे सुमितने सांगितले.