टेलिव्हिजनवरील काही प्रसिद्ध विनोदवीरांच्या यादीतील एक नाव म्हणजे भारती सिंग. काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलेल्या भारती सिंगने तिच्या विनोदी शैलीने अनेकांची मने जिंकत स्वत:ची अशी एक ओळख प्रस्थापित केली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंग सध्या मात्र तिच्या विनोदी शैलीमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. भारती सिंग लवकरच तिच्या प्रियकरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर भारती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिंबाचिया यांचा रोका नुकताच एका खाजगी समारंभात पार पडल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

हर्ष लिंबाचिया, भारतीच्या टेलिव्हिजन शोचा लेखक आहे. दरम्यान, भारती आणि हर्षच्या रोक्याच्या समारंभाला हजेरी लावलेल्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रोका पार पडल्यानंतर अंधेरीतील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व काही अगदी शेवटच्याच क्षणी ठरल्यामुळे या समारंभात काही निवडक चेहरेच पाहायला मिळाले. विनोदवीर कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह, निर्माता विपुल शाह आणि भारतीच्या कार्यक्रमातील काही सहकलाकारही भारतीला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

A photo posted by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

भारती आणि हर्षच्या नात्याविषयीच्या विविध चर्चांना गेल्या वर्षभरापासूनच उधाण आले होते. त्यामुळे आता भारती लवकरच हर्षसोबत लग्नबंधनात अडकू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. याशिवाय भारती आणि हर्ष यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विवाहबद्ध होण्याच्या चर्चांना उधाण आले असून ही जोडी लवकरच ‘नच बलिये’च्या नव्या पर्वात दिसू शकते असेही म्हटले जात आहे. सध्या भारती सिंग कलर्स वाहिनीवरील ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचा खळखळून हसवत आहे.