‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून काढता पाय घेतल्यानंतर विनोदवीर सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर येणं टाळलं आहे. ट्विटर, फेसबुकवरुन सुनीलने या सर्व प्रकरणी त्याची प्रतिक्रिया दिली असली, तरीही झाल्या प्रकरणी त्याचे मौन अनेक प्रश्नांना वाचा फोडत असून, विनोदवीर एहसान कुरेशी यांनीही हा प्रश्न उपस्थित केला आहे. या तिघांनी उंदराप्रमाणे बिळात लपून न बसता समोर येऊन परिस्थिती हाताळावी, असे वक्तव्य कुरेशी यांनी केले.

प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि त्यांना खळखळून हसवणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’वर गेल्या काही दिवसांपासून संकटांचे सावट आले आहे. मेलबर्न येथील एक कार्यक्रम आटोपून मायदेशी परतत असताना विमान प्रवासादरम्यान सहकलाकारांसोबत कपिल शर्माचा वाद झाला. हा वाद इतका विकोपास गेला की, कपिलला सांभाळण्यासाठी गेलेल्या सुनील ग्रोवरलाच कपिलने मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केलीच त्याचबरोबर तो सुनीलच्या अंगावरही धावून गेला. या घटनेनंतर सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनी ‘द कपिल शर्मा शो’चा एक प्रकारे निषेध करत कार्यक्रमाच्या चित्रिकरणास जाण्यास नकार दिला. या प्रसंगी त्या तिघांनीही सर्वांसमोर येऊन त्या घटनेविषयी उघडपणे त्यांची भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. पण, असे काहीही न झाल्यामुळे एहसान कुरेशींनी हे वक्तव्य केले.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये न परतण्याचा निर्णय घेत सुनील, अली आणि चंदनचे असे सर्वांपासून दूर राहणे चुकीचे असून, त्यांनी सर्वांसमोर यावे’, असे मत एहसान कुरेशी यांनी मांडले. ‘तुमच्या सोबत त्या क्षणी नेमके काय झाले होते ही गोष्ट तुम्ही सर्वांसमोर आणा. माझ्या मते जर कोणावरही अन्याय झाला असेल तर त्यांनी त्याबद्दल बोलणे अपेक्षित आहे. तुमचा मुद्दा सर्वांसमोर मांडला गेला पाहिजे. आम्ही सगळेच तुमच्यासोबत आहोत.’ असेही एहसान म्हणाले.

काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’च्या एका भागात विनोदवीर राजू श्रीवास्तव, सुनील पाल आणि एहसान कुरेशी यांनी हजेरी लावली होती. पण, या कलाकारांच्या गप्पा आणि त्याला मिळालेली विनोदी शैलीची जोड प्रेक्षकांची दाद मिळवण्यात अयशस्वी ठरली. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाचा फटका कार्यक्रमाला पडत असल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांमध्ये ‘द कपिल शर्मा शो’च्या टीआरपीमध्येही काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.